ओ ETV Marathi वाले,

आजवर तुम्हाला जवळपास सर्व नियतकालीकांच्या समीक्षकांकडून एक एक तरी hate mail आली असणारच! पण आमची ही hate mail अगदी वेगळ्या धाटणीची आहे बरं का! जशी तुमची प्रत्येक मालिका अगदी वेगळी असल्याचा दावा त्यातले कलाकार करतात की नाही? तसलाच प्रकार हा. आता प्रत्येकच जण म्हणतो, त्याची mail इतरांपेक्षा वेगळी आहे. पण आमची ही mail एकदा वाचून तर बघा, मग जाणवेल तुम्हाला एक नाविन्य. तसा ह्या mail मधला मसाला नेहमीचाच आहे हो! (ही सगळी arguments तुमच्याच वाहिनी वरुन चोरली आहेत बरंका. आम्ही पडलो पुणेरी. स्पष्टवक्तेपणा आमचा गुणच आहे!)

तर त्याचं झालं असं. तब्बल दोन महीन्यानी etv marathi बघण्याचा योग आला. म्हटलं link लागेल की नाही! पण काही विशेष जड गेलं नाही. पहिल्यांदा तर मजाच झाली. स्वाती चिटणीस, अविष्कार, डॉ विलास उजवणे, आनंद अभ्यंकर यांना एकाच frame मध्ये पाहिलं की कळतच नाही हो कुठली मालिका चालू आहे ते! मग अभ्यंकरांच्या खोट्या दाढी मिश्यांवरून ओळखलं नाव! आहे की नाही मजा?

serial सुरु होतेय तोच जाहीरातींचा सपाटा सुरु झाला. मग जाहीराती संपल्या तेव्हा कळलं आपण कुठलीतरी serial बघत होतो ते. तर,जाहिरातींमध्ये मधुरा वेलणकरची नविन मालिका सुरु होणार हे कळलं. "साता जन्माच्या गाठी" म्हणून. पहिला episode केवळ तिच्यासाठी बघितला. छान टपोरे काळेभोर डोळे, चाफेकळी नाक, धनुष्यासारखे कमनीय ओठ, आणि ओठांच्या डावीकडे पडणारी गोजिरी खळी... पण ह्या सगळ्यात गुंग असतानाच वरती etv marathi चा लोगो दिसला, आणि नुकत्याच उमलू घातलेल्या मोग-याच्या शुभ्र कलिकेवर झुरळ विराजमान झाल्याचं चित्र डोळ्यासमोर आलं! आणि तो लोगो etv चा होता म्हणून की काय, पुढच्याच क्षणी ते ढब्बं झुरळ चपलेखाली चिरडलं गेल्याचं दृश्य आलं! बाई गं, एकच मागणं आहे. सिद्धिविनायकाला १००० मालिकांचा प्रसाद वाहता वाहता स्वत:चा मोदक होवू देऊ नकोस. आमची सर्वांची लाडकी कविता लाड हिचं काय झालंय बघते आहेस ना? नसलस बघितलं, तर तुझ्या मालिकेचं shooting झाल्यावर रेंगाळ जरा सेट वर. ती येइल तिथेच. हे etv वाले सर्वं मालिकांना तोच सेट वापरतात नाही तरी. set ही तेच, अन्‌ माणसंही तीच! अहो डॉ. उजवणे, डोक्यावर केस उगवणे, हा तुमच्यासाठी एक कल्पनाविलास आहे हे आम्ही चांगलं जाणतो. तुम्ही निम्म्या मालिकांमध्ये टोप घाला किंवा नका घालू, तुमच्या character मध्ये यत्किंचितही फरक पडत नाही. आम्ही लगेच ओळखतो तुम्हाला. दुसरे एक टोपाजीराव अभ्यंकर, त्यांच्याही राज्यात असलाच आनंद आहे! चिटणीस बाई, आपण एका मालिकेसाठी फिगर मेंटेन करायला जाता, आणि दुस-या serial मधली भक्कम आजी लुकडी होते की हो! पण etv च्या मालिकेला 'नाही' कसं म्हणणार नाही का? साक्षात देवयानीच तुम्ही!

ती extra-marital affairs, pre-marital pregnancy, सांस - बहू आता खरोखर बोअर व्हायला लागलीये हो. काटा रुते कोणाला म्हणता म्हणता का आम्हालाच साळू सारखे एकसमान सिरियल्य्स चे सहस्र काटे मारता? चार दिवस सासूचे बघता बघता, आमच्या या गोजिरवाण्या डोक्याची पार अग्निशिखा होते हो! तुमच्या आमच्या नाहीतरी साता जन्माच्या गाठी जुळल्या आहेतच. त्याचं काय़ आहे, तुमची वाहिनी आम्हाला झक मारत बघावीच लागते. आमच्या कडे आहे DTH service. त्यात फुकट दिसणा-य़ा मराठी वाहिन्या दोनच! एक तुमची, आणि दुसरी तर इतकी अति-महा-भुक्कड आहे, की " 'स' पासून सुरू होणारी आणि 'द्री' ने संपणारी एखादी वाहिनी आठवतेय का?" असं विचारल्यावर लोक बोंबिलवाडीतल्या प्रमाणे सरळ निगरगट्टपणे "नाSही" म्हणून मोकळे होतील!

बरेच मुद्दे खरं म्हणजे सांगायचे होते, पण सगळेच आत्ता आठवत नाहीयेत. आणि आम्हाला पांचट लांबणं लावायची सवयही नाहीये. तरीपण, पुरुष निर्मातेहो, तुमची जराशी मर्दुमकी आणि स्त्री निर्मात्याहो, तुमच्या ३३% आरक्षित स्वाभिमाना पैकी प्रत्येक जिन्नस थोडा-थोडा जरी शिल्लक असेल तर एखादी खरंच नविन कलाकृती करून दाखवाल. नाहीतर तुम्हाला माझं open challenge आहे, मी तुमच्यापेक्षा सरस मालिका काढून दाखवीन! TRP च्या मागे लागून काय करून घेतलं आहेत हो स्वत:चं! काय आहे, एखाद्या finite set मधल्या प्रत्येक element ला एक एक real number (ह्या case मध्ये TRP Rating) जोडला की त्यात एक maxima मिळणारच की नाही? माफ करा, संसारीक प्रश्न सोडवताना तुमची तर्कबुद्धी लयाला गेली आहे विसरलोच मी! थोड्क्यात सांगायचं, तर वासरात लंगडी गाय शहाणीच ठरते!, म्हणून म्हणतो, आता उचला पावलं लवकर...

कळावे,

लोभ नसला तरी काSही बिघडत नाही,

तुमचाच वेल्विशर!