टप्पा

जीवनोपयोगी वस्तूंवर शे-सव्वाशे रुपये खर्चून शॉप्सी (आय. आय. टी. का. मधले खरेदी संकुल) मधून बाहेर आलो, आणि वाटेत एका १२-१३ वर्षाच्या केविलवाण्या मुलाने थांबवलं. ब-यापैकी मळलेले कपडे, लांब थकलेला चेहरा, किंचितसे लाल डोळे.

"भैय्या, बीस रुपए दो, किताब खरिदनी है ---"

"कौनसी किताब ?"

"--- गणित ... (काहीतरी) भारती"

मी दोन मिनिट बंद पडलो.

"आओ, सामने की दुकान से खरीदते है, मै भी तुम्हारे साथ चलता हूँ ।"

आम्ही दोघे शेजारच्या पुस्तकाच्या दुकानात शिरलो. तिथे काही ती किताब नव्हती. म्हणून बाहेर आलो.

"शायद यहाँ नही मिल पायेगी... कल्याणपुर जाना पडेगा ---" तो भावशून्य नजरेने उद्गरला. बहुधा त्याने आधी कोणाबरोबर तरी हेच सोपस्कार पार पाडले असावेत. "--- आप मुझे पैसा दे दिजीए..."

"मुझे कैसे पता चलेगा, तुम इस पैसे से किताब ही खरीदोगे ?"

"आप आपका पता दे दिजीए... मै आ कर दिखाउँगा ..."

काहीही केलं असतं तरी अंतत: ते चूकच ठरलं असतं. मी मुकाट्याने २० रुपये काढून त्याच्या हातात ठेवले.

"भगवान कसम किताब ही खरीदोगे ?"

"बिद्या कसम."

एकही अधिक अक्षर न उच्चारता आम्ही दोघे विरूद्ध दिशेला निघून गेलो.

------

दीड वर्षांपूर्वीची गोष्ट. महीना डिसेंबर. पुण्याहून कानपूर ला येताना माझ्याकडे confirmed तिकिट नव्हतं. Waiting List ने प्रवास करण्यावाचून गत्यंतरही नव्हतं.काही मित्र गाडीत होते, पण रात्री झोपण्याची अडचण होणार हे निश्चित होतं. रात्र झाली. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदि भागांमध्ये ह्या दिवसांत बेक्कार थंडी पडते. डब्याची दारं आणि एकूण एक खिडक्या बंद होत्या. माझ्याकडे एक वर्तमानपत्र होतं ते मी दोन बर्थ्स च्या मध्ये जमीनीवर अंथरलं, पायात मोजे चढवले, शाल घेतली आणि झोपायला म्हणून आडवा झालो. मला वाटलं होतं, खाली कमी थंड असेल. पण, दुर्दैवाने, डब्याच्या जमीनीवरून अत्यंत बोचरा वारा वाहत होता. दारं - खिडक्या बंद असून सुद्धा. मला असल्या विचित्र गोष्टीचा मुळीच अंदाज नव्हता. थोड्यावेळाने खालचा पेपरही गार पडू लागला, आणि झोपणं अशक्य होऊन बसलं. काही वेळ अंग मुडपून झोपल्यावर पाठ दुखू लागली. थंडी अक्षरश: हाडांपर्यंत जाऊन भिडली. काय करावं काही सुचेना...

लगतच्या कंपार्टमेंट मध्ये झोपलेल्या माणसाने माझी ही दयनीय अवस्था बघितली असावी. तो माझ्यापाशी आला आणि करूणापूर्ण आवाजात "यह लो..." म्हणत मला त्याच्याकडची एक चादर देऊ केली. तेव्हा इतकं अपराधी मला कधीच वाटलं नव्हतं.

त्या चादरीने माझी हालत फार काही सुधारली नाही... महत्प्रयासाने ती रात्र पार पडली.

------

आठवीत असताना, कुठल्यातरी प्रकल्प स्पर्धेत भाग घेतला होता. (त्या काळी केलेले सगळे प्रकल्प एक से बढकर एक असत.) आम्ही तिघे मित्र citrus fruits च्या सालींपासून वीजनिर्मिती करत होतो. प्रकल्पाचं सारं काम प्रशालेच्या वेळातच चालायचं. एक दिवस बाईंनी सांगितलं -- जा असल्या साली वगैरे मिळवून आणा. एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली अन् आम्ही निघालो. रस्त्यावरच्या फळविक्रेत्याकडून त्यांचा साठलेला कचरा त्या पिशवीत टाकू लागलो. हळूहळू रस्त्यावरच्या बाकीच्या गोष्टी नाहीश्या होऊन फक्त असला पौष्टीक कचरा आम्हाला दिसू लागला. आमची पिशवी सुद्धा फुगू लागली. फिरता फिरता आम्ही आप्पा बळवंताच्या चौकात आलो. आणि तिथे कुठे काही मिळतय का ते बघू लागलो. आमचे कपडे वगैरे सगळे ठीकठाक होते.

समोरून एक चिमुरडी तिच्या आईबरोबर जात होती. आमच्याकडे बोट करून आईला म्हणाली:

"आई, ती बघ कचरा गोळा करणारी मुलं ...!"

------

`टप्पा` हा संगितप्रकार ऐकला आहेत कधी?

------

Crazy Ideas (3)
पडदा

लहानपणी आपल्या ह्या विश्वाविषयी किती भन्नाट कल्पना असतात नाही? चित्र विचित्र प्रश्न असतात, गंमतशीर कल्पना असतात. ते सगळं जगच वेगळं असतं.
लहानपणी माझी आपल्या पचनसंस्थेबद्दल एक अफाट कल्पना होती. मला वाटायचं की आपल्या पोटात प्रत्येक पदार्थाची एक स्वतंत्र पिशवी असते. ( माझ्या मनात जेव्हा हे सगळं [वि]चित्र तयार व्हायचं तेव्हा त्या पिशव्यांवर पदार्थांची नावंही लिहिलेली असायची! ) आणि घशामधून अन्ननलिकेला खूप फाटे फुटून प्रत्येक पिशवीत एक एक गेलेला असातो. त्या वेळी असा प्रश्न कधी पडला नाही की पदार्थाला कळणार कसं "स्वत:च्या" पिशवीत जायचं ते, पण दरवेळी नवीन जिन्नस खाताना ही चिंता वाटायची की त्याच्या नावाचं "account" आपल्या पोटात असेल की नाही! मला लहानपणी अजून काही शंकांनी जाम सतावलं होतं. उदाहरणार्थ: पोळी आणि Parle-G बिस्कीट ह्या दोन्ही पासूनही एकाच प्रकारचं रक्त कसं काय तयार होतं? वास्तविक कुठल्याही दोन वेगळ्या पदार्थांपासून एकसारखं रक्त कसं तयार होईल अशी शंका असायची, पण somehow माझ्या डोळ्यासमोर पोळी आणि Parle-G च यायचे! हात दुखायचा थांबण्यासाठी पोटात घेतलेल्या गोळीला बरोबर हातच कसा दुरुस्त करता यायचा कोण जाणे! आपण रोज इतके आवाज ऐकतो, ते डोक्यात साठून राहील्यामुळे आपलं डोकं खूपच्या-खूप मोठं होईल असंही वाटे मला.

कालंतराने इयत्ता दुसरीत गेलो. तोपर्यंत जग थोडसं मोठं झालं होतं. कोणीतरी ती टिळकांची एक गोष्ट सांगितली. त्यांना "कादंबरी" नावाचं पुस्तक वाचायचं होतं म्हणे. तर त्यासाठी त्यांना वडिलांनी एक महा-अवघड गणित घातलं, मग टिळकांनी ते ब-याच खटपटीनंतर सोडवलं आणि ते पुस्तक मिळवलं. आता आम्हाला दुसरीला गणितामध्ये बेरजा वजाबाक्या शिकवल्या असतील फार तर फार. त्यामुळे गणितामध्ये अजूनही खूप गोष्टी असतात ह्याची आम्हाला काय कल्पना? म्हटलं अवघड अवघड असून किती अवघड असणार हे गणित? डोक्यावरून पाणी म्हणजे २०० अंकाच्या बेरजा-बिरजा असतील. पण तेही काही अवघड नाही. मग मी ती गोष्ट दंतकथा म्हणून सोडून दिल्याचं आठवतय मला. आता कळतय अवघड गणितं म्हणजे काय ते!

लहानपणीच्या मजेदार प्रश्नांची उत्तरं कालांतराने मिळत गेली. गैरसमजही हळू हळू दूर होत गेले. स्वप्न आणि सत्यामधले तलम पडदे हवेत विरघळून गेले. पण आताशा, वयाने मोठं झाल्यापासून, स्वप्नांमधून जाग येते ती सणसणीत कानाखाली मारल्यासारखी.
एखादी संध्याकाळ येते, आकाशातील रंगांची उधळण नुकती ओसरू लागलेली असते, आणि मोहक चांदण्या रात्रीची चाहूल लागलेली असते. जिच्या समोर त्या संध्येची शोभाही फिकी पडावी अशा एका युवतीशी आपली ओळख होते. विचार सागरातल्या तरंगांच्या मत्त लाटा होऊ लागतात... आणि तेव्हाच... तिच्या पर्स मधून ज्याच्याशी तिचा मनोनिश्चय झाला आहे, अशा तरूणाचा फोटो डोकावतो. पायाशी पडलेले असतात ते तलम पडद्याचे चुरगाळलेले भग्नावशेष...!

Crazy Ideas (2)
Simultaneity: एक क्षण.... ईष्टॉप!

ही कल्पना खरं म्हणजे मला खूप आधी सुचली होती, पण त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालं ते एक दिवस बंटी बरोबर बोलताना. ह्यावेळेस मी ती तुमच्यापर्यंत कितपत ताकदीने पोहोचवू शकेन ह्याबद्दल थोडा साशंक आहे, बघूया.

एका given instant ला जगात किती असंबद्ध आणि मजेदार गोष्टी घडत असतात ह्यावर विचार केलाय कधी? असल्या घटना घडत असतील हे आपल्या गावीही नसतं ब-याच वेळा! जेव्हा आपल्या शेजारच्या गंप्याला तयार करून त्याची आई शाळेत पाठवत असेल, तेव्हा आफ्रीकेतील सोमालिया चा पंतप्रधान प्रातर्विधी उरकत असेल कदाचित! आत्ता तुम्ही हा ब्लॉग वाचताय, तेव्हाच कोणीतरी तुमची आठवण काढत असेल, अशी आठवण काढणा-यांची लांबलचक साखळीही असेल किंबहुना. जेव्हा एके ठिकाणी काही निरागस पोरं लपंडाव खेळत असतील, तेव्हा दूर कुठेतरी बॉंब बनत असतील. एखादा माणूस मिटक्या मारत खात असेल, तेव्हा दुस-याला जुलाब झाले असतील. क्याय च्या क्याय गोष्टी घडू शकतात. निवांत संध्याकाळी एखादा शेतकरी शेतावरून दमून भागून घरी येवून निवांत पडला असेल, आणि त्याच वेळेस एखादा नोकरदार आपल्या कामाच्या deadlines संभाळण्यासाठी रात्रीचा दिवस करत असेल. मी हा ब्लॉग लिहायचा असं ठरवलं तेव्हा खूप भन्नाट गोष्टी सुचल्या होत्या, आता अजिबात आठवत नाहीयेत. comments मध्ये तुम्ही मुद्यावरून गोष्ट पूर्ण कराल अशी अपेक्षा आहे!

ह्या सगळ्यातून एक फार मस्तं कल्पना आली. (खरं म्हणजे उलटं झालं होतं. असो.) समजा एक मुलगा आहे, भारतात वाढला, शिकला. मग उच्च-शिक्षणासाठी/नोकरीसाठी युरोपात गेला. एक मुलगी आहे, जी अमेरीकेत वाढली, शिकली, आणि तीही अशीच युरोपात आली. आता ह्या दोघांची इथे गाठ पडली, लग्न बिग्न झालं. आणि सगळ्या घटनांचा लेखाजोखा ठेवणा-य़ा चित्रगुप्ताने केली एक मजा. त्याने ह्या दोघांना दिली एक वही. त्यात त्यांनी जगलेला प्रत्येक क्षण लिहिला होता, आणि त्यापुढे त्या दोघांनी त्या क्षणात काय केलं हे लिहिलेलं होतं. मस्तं चांदण्या रात्री त्या दोघांनी ती वही वाचायला सुरुवात केली. त्यांची पूर्वायुष्य इतकी disconnected होती की ती वही वाचताना जाम धमाल उडत होती.
"ए हे बघ, जेव्हा तू IMO मध्ये गणितं सोडवण्यात गर्क होतास, तेव्हा कशी मी मस्त ice-creams खात होते".
"अजून मजा. आपण दोघांनीही ह्या दिवशी पांढरा t-shirt घातला होता. what a coincidence!"
"तू तिथे शेंबूड पुसत होतीस, आणि मी इथे बशीत नुकत्याच पडलेल्या गरमा-गरम भज्यांचा आस्वाद घेत होतो."
"जेव्हा तू तिथे Price Charming ची स्वप्नं रंगवत होतीस, तेव्हा असला कोणीतरी जगाच्या दुस-या टोकावर राहणारा बाबा आपला नवरा होईल ह्याची तुला इवलीशी तरी कल्पना होती का?"
"मी इकडे माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर छान मजा करत होते, आणि तू तिथे निवांत घोरत पडला होतास!"
क्याय च्या क्याय. किती अनंत गमती घडू शकतात!
कधीतरी ह्या सगळ्या विचित्र चित्रामध्ये स्वत:ला रंगवून पहा. अजून सहस्र पटीने कमाल होईल.
ही सगळी कल्पनाच इतकी भन्नाट आहे, की मला पुढे काही सुचतंच नाहीये. बघा तुम्ही प्रयत्न करून!
Fairytale

I envy the sun, enlightens it everyone,
I envy the moon, it can see anyone,
I envy the wind, it can touch anyone,
I envy that little golden piece which rests on the heart of the only one…
Crazy Ideas (1)

नाविन्य: Roads and Songs, Before Sunrise.

देवाने जीवनात प्रचंड सुसूत्रता करून ठेवली आहे. गरज असते, ती फक्त डोळस पणे बघण्याची. एखादं गाणं एखाद्या प्रसंगाची आठवण करून देतं, एखादी आठवण एखादं स्वप्नं देवून जाते... आणि ह्या नंतर ह्या सगळ्यांकडे बघितल्यावर कळतं, त्या जगन्नियंत्याला एकच गोष्ट सांगायची होती, फक्त माध्यमं वेगळी होती. हे सगळं फार romantic होतंय खरं. पण मला जी गोष्ट सांगायची आहे, ती आहेच मुळी विचित्र.

तर झालं असं. मी ७ वी ते १० वी शाळेला cycle ने जायचो. एकदा मला रस्त्यावरून जातांना असं आढळलं, की रोज त्या पथावरून जाताना, माझं लक्ष त्याच त्या खाणाखुणांकडे जातं. म्हणजे अगदी घरापासून सुरुवात केली, की वीराच्या मारुतीपासच्या रस्त्यावर माझ्याकडून road divider कडे बघितलं जाणारंच. हमखास. त्यानंतर न. म. शा. पाशी ब-याच वेळा शाळेच्या गेट कडे लक्ष जाणार. त्यानंतर एका छोट्याश्या गल्लीतून लक्ष्मी रोड ला लागताना एका watch company च्या दुकाना कडे लक्ष गेलंच पाहीजे. शाळेतून घरी येताना एक particular नील फलक वाचला जाणारंच. काही काही दुकानं तर अशी होती, की ज्यांच्या पाट्या माझ्याकडून रोज न चुकता वाचल्या जायच्या. आपोआप. सवयच लागली होती मानेला आणि नजरेला. मला मोठी मौज वाटली. मग मी अजून एक मजा करायचं ठरवलं. एकदा मी असं मानलं की आपण ह्या शहरात नवीनच आलो आहोत. आणि प्रयत्नपूर्वक दुसरीकडेच बघायला सुरुवात केली. काही काही buildings च्या कडे मी कधीही बघत नसे, त्यांच्याकडे बघितलं. वेगळ्या दुकानांच्या पाट्या वाचल्या. रस्त्यावरच्या इतर खुणा टिपायला लागलो. आणि गम्मत म्हणजे रस्त्यांचा पूर्ण चेहरामोहरा आणि स्वभावच बदलून गेला. काही रस्ते मला कुरूप वाटायचे ते एकदम सुंदर झाले, तर काहींचं एकदम उलटं झालं! हल्ली सुद्धा मी कधी पुण्याला गेलो, की हा प्रयोग करून पाहतो. जाम मजा येते!

3rd semester मध्ये मी Enya च्या संगीताच्या अक्षरश: प्रेमात पडलो होतो. त्यानंतर ती गाणी मी पुष्कळ वेळा ऐकली. The Corrs च्या गाण्यांचंही असंच झालं. ही गाणी मी इतक्या वेळा ऐकली की त्यांच्या आत्म्याचा हिरण्यगर्भ पूर्णपणे झाकोळला गेला. एकदा Corrs चं गाणं ऐकत असताना त्यात एक नविनच वाद्य वाजत असल्याचं आढळलं. मग मी ती गाणी परत नव्याने ऐकायला सुरुवात केली. आणि त्यांचाही कायपालट झाला. Corrs च्याच एका गाण्याचा video खूप वेळा बघून झाल्यावर माझ्या लक्षात आलं की गाणं एका विशिष्ट ठिकाणी आल्यावर माझं लक्ष Andrea वाजवत असलेल्या Tin Whistle कडे जाणारंच. मग मी ते जाणीवपूर्वक बदलायला सुरुवात केली आणि गाण्यांना नवीन बहार आला. एकदा घरी अगदी वेगळ्या वातावरणात Enya ची गाणी ऐकली आणि ती पहिल्यांदा ऐकताना जसं वाटलं होतं, तसंच वाटलं अगदी. एकदम सही. पण एक गोष्ट आहे. एखादं संगीत प्रथम ऐकतांना जसं वाटतं, तंतोतंत तसं परत कधीच वाटत नाही. ती नाविन्याची मजा काही औरच असते.

आमच्या घारासमोर एक वाडा आहे. तो मूळ दुमजली वाडा होता. त्याच्या उजव्या बाजूला त्यापेक्षा थोडा उंच पारसनिस वाडा आणि डाव्या बाजूला चार मजली इमारत आहे. तर, त्या समोरच्या घराच्या भिंतीमधून पिंपळ उगवला आणि त्या वाड्याच्या पडझडीस कारणीभूत ठरला. कालांतराने त्या वाड्याचं Apartments मध्ये रूपांतर करायचं ठरलं. त्याचा वरचा मजला पाडून टाकण्यात आला. आणि ते काम रखडलं. आता दोन्ही बाजूंना वाडे, इमारती, आणि मध्ये हा बुटका एकच मजला. त्यातून पावसाळ्य़ात ह्या वाड्याच्या उघड्या बोडक्या भिंतीच्या टकलावर छानपैकी हिरवळ उगवायला लागली आणि तो वाडा सर्वप्रकारे गमतीदार दिसू लागला. मग आता मी ह्याही वाड्याचा "मानसिक कायापालट" करायच ठरवलं. एकदा बाकीच्या सगळ्या गोष्टी पुसून टाकल्या फक्त मागची मुठा नदी आणि झाडी राहू दिली. वाड्यावर सायंकाळची तांबूस उन्हे टाकली. आणि त्याला एकदम ऐतिहासिक भग्नावशेष करून टाकला. नंतर काही दिवसांनी पुण्यात थंडी वाढली, म्हणून सगळीकडे "मानसिक बर्फ" पाडला! त्यावेळेस विचारसागरात मुद्दाम खडे मारून तयार केलेले ते तरंग तर केव्हाच विरून गेले... आता उरलंय ते फक्तं त्यांचं शब्दचित्र!

नाविन्य म्हणजे तर जीवन आहे. हजारो वर्ष चंद्राची एकच बाजू बघून मानव जेव्हा कंटाळला, तेव्हा त्याने त्याची दुसरी बाजू न्याहाळायला उड्डाण केलं. नाविन्य म्हणजेच तर जीवन आहे... गरज असते, ती फक्त डोळस पणे बघण्याची!

The story of my experiments with Dreams. (2)

Actually, I don’t have much interesting to add to my previous entry on the related topic.

However I would like to make a small classification of dreams.

There are two types of dreams I get. The first type is of Shallow Dreams. They are just superficial outburst of my recent emotions. The other type is that of Deep Dreams. In this type of dreams, I see crazy things, mostly incoherent with my present mindset. These dreams might yield interesting results upon interpretation.

Recurrence

So, while I was home for the winter vacations, I got a recurrent dream. I had seen this dream before, and I came to know this only after having that dream for the second time. Now, this time, the characters were more vivid. Both the dreams were centered about the same person, and I could remember her outfit in the second dream. I believe that the dream was obviously a Shallow one. I remember getting a tacit feeling of remembering the earlier dream while I was watching it for the second time. But the second dream was much more memorable.

Expecting a dream:

Two days back, something happened, that made me expect that I would get a certain type of dream. And I actually got that dream. Not wholly in the form I expected, but more or less the same.

(NB: All the 3 dreams were about existing persons. And telling the stories by putting “X” instead of their names is not a good idea either. For, after reading the descriptions, most of you can guess who they are.)