Crazy Ideas (3)
पडदा

लहानपणी आपल्या ह्या विश्वाविषयी किती भन्नाट कल्पना असतात नाही? चित्र विचित्र प्रश्न असतात, गंमतशीर कल्पना असतात. ते सगळं जगच वेगळं असतं.
लहानपणी माझी आपल्या पचनसंस्थेबद्दल एक अफाट कल्पना होती. मला वाटायचं की आपल्या पोटात प्रत्येक पदार्थाची एक स्वतंत्र पिशवी असते. ( माझ्या मनात जेव्हा हे सगळं [वि]चित्र तयार व्हायचं तेव्हा त्या पिशव्यांवर पदार्थांची नावंही लिहिलेली असायची! ) आणि घशामधून अन्ननलिकेला खूप फाटे फुटून प्रत्येक पिशवीत एक एक गेलेला असातो. त्या वेळी असा प्रश्न कधी पडला नाही की पदार्थाला कळणार कसं "स्वत:च्या" पिशवीत जायचं ते, पण दरवेळी नवीन जिन्नस खाताना ही चिंता वाटायची की त्याच्या नावाचं "account" आपल्या पोटात असेल की नाही! मला लहानपणी अजून काही शंकांनी जाम सतावलं होतं. उदाहरणार्थ: पोळी आणि Parle-G बिस्कीट ह्या दोन्ही पासूनही एकाच प्रकारचं रक्त कसं काय तयार होतं? वास्तविक कुठल्याही दोन वेगळ्या पदार्थांपासून एकसारखं रक्त कसं तयार होईल अशी शंका असायची, पण somehow माझ्या डोळ्यासमोर पोळी आणि Parle-G च यायचे! हात दुखायचा थांबण्यासाठी पोटात घेतलेल्या गोळीला बरोबर हातच कसा दुरुस्त करता यायचा कोण जाणे! आपण रोज इतके आवाज ऐकतो, ते डोक्यात साठून राहील्यामुळे आपलं डोकं खूपच्या-खूप मोठं होईल असंही वाटे मला.

कालंतराने इयत्ता दुसरीत गेलो. तोपर्यंत जग थोडसं मोठं झालं होतं. कोणीतरी ती टिळकांची एक गोष्ट सांगितली. त्यांना "कादंबरी" नावाचं पुस्तक वाचायचं होतं म्हणे. तर त्यासाठी त्यांना वडिलांनी एक महा-अवघड गणित घातलं, मग टिळकांनी ते ब-याच खटपटीनंतर सोडवलं आणि ते पुस्तक मिळवलं. आता आम्हाला दुसरीला गणितामध्ये बेरजा वजाबाक्या शिकवल्या असतील फार तर फार. त्यामुळे गणितामध्ये अजूनही खूप गोष्टी असतात ह्याची आम्हाला काय कल्पना? म्हटलं अवघड अवघड असून किती अवघड असणार हे गणित? डोक्यावरून पाणी म्हणजे २०० अंकाच्या बेरजा-बिरजा असतील. पण तेही काही अवघड नाही. मग मी ती गोष्ट दंतकथा म्हणून सोडून दिल्याचं आठवतय मला. आता कळतय अवघड गणितं म्हणजे काय ते!

लहानपणीच्या मजेदार प्रश्नांची उत्तरं कालांतराने मिळत गेली. गैरसमजही हळू हळू दूर होत गेले. स्वप्न आणि सत्यामधले तलम पडदे हवेत विरघळून गेले. पण आताशा, वयाने मोठं झाल्यापासून, स्वप्नांमधून जाग येते ती सणसणीत कानाखाली मारल्यासारखी.
एखादी संध्याकाळ येते, आकाशातील रंगांची उधळण नुकती ओसरू लागलेली असते, आणि मोहक चांदण्या रात्रीची चाहूल लागलेली असते. जिच्या समोर त्या संध्येची शोभाही फिकी पडावी अशा एका युवतीशी आपली ओळख होते. विचार सागरातल्या तरंगांच्या मत्त लाटा होऊ लागतात... आणि तेव्हाच... तिच्या पर्स मधून ज्याच्याशी तिचा मनोनिश्चय झाला आहे, अशा तरूणाचा फोटो डोकावतो. पायाशी पडलेले असतात ते तलम पडद्याचे चुरगाळलेले भग्नावशेष...!