टप्पा

जीवनोपयोगी वस्तूंवर शे-सव्वाशे रुपये खर्चून शॉप्सी (आय. आय. टी. का. मधले खरेदी संकुल) मधून बाहेर आलो, आणि वाटेत एका १२-१३ वर्षाच्या केविलवाण्या मुलाने थांबवलं. ब-यापैकी मळलेले कपडे, लांब थकलेला चेहरा, किंचितसे लाल डोळे.

"भैय्या, बीस रुपए दो, किताब खरिदनी है ---"

"कौनसी किताब ?"

"--- गणित ... (काहीतरी) भारती"

मी दोन मिनिट बंद पडलो.

"आओ, सामने की दुकान से खरीदते है, मै भी तुम्हारे साथ चलता हूँ ।"

आम्ही दोघे शेजारच्या पुस्तकाच्या दुकानात शिरलो. तिथे काही ती किताब नव्हती. म्हणून बाहेर आलो.

"शायद यहाँ नही मिल पायेगी... कल्याणपुर जाना पडेगा ---" तो भावशून्य नजरेने उद्गरला. बहुधा त्याने आधी कोणाबरोबर तरी हेच सोपस्कार पार पाडले असावेत. "--- आप मुझे पैसा दे दिजीए..."

"मुझे कैसे पता चलेगा, तुम इस पैसे से किताब ही खरीदोगे ?"

"आप आपका पता दे दिजीए... मै आ कर दिखाउँगा ..."

काहीही केलं असतं तरी अंतत: ते चूकच ठरलं असतं. मी मुकाट्याने २० रुपये काढून त्याच्या हातात ठेवले.

"भगवान कसम किताब ही खरीदोगे ?"

"बिद्या कसम."

एकही अधिक अक्षर न उच्चारता आम्ही दोघे विरूद्ध दिशेला निघून गेलो.

------

दीड वर्षांपूर्वीची गोष्ट. महीना डिसेंबर. पुण्याहून कानपूर ला येताना माझ्याकडे confirmed तिकिट नव्हतं. Waiting List ने प्रवास करण्यावाचून गत्यंतरही नव्हतं.काही मित्र गाडीत होते, पण रात्री झोपण्याची अडचण होणार हे निश्चित होतं. रात्र झाली. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदि भागांमध्ये ह्या दिवसांत बेक्कार थंडी पडते. डब्याची दारं आणि एकूण एक खिडक्या बंद होत्या. माझ्याकडे एक वर्तमानपत्र होतं ते मी दोन बर्थ्स च्या मध्ये जमीनीवर अंथरलं, पायात मोजे चढवले, शाल घेतली आणि झोपायला म्हणून आडवा झालो. मला वाटलं होतं, खाली कमी थंड असेल. पण, दुर्दैवाने, डब्याच्या जमीनीवरून अत्यंत बोचरा वारा वाहत होता. दारं - खिडक्या बंद असून सुद्धा. मला असल्या विचित्र गोष्टीचा मुळीच अंदाज नव्हता. थोड्यावेळाने खालचा पेपरही गार पडू लागला, आणि झोपणं अशक्य होऊन बसलं. काही वेळ अंग मुडपून झोपल्यावर पाठ दुखू लागली. थंडी अक्षरश: हाडांपर्यंत जाऊन भिडली. काय करावं काही सुचेना...

लगतच्या कंपार्टमेंट मध्ये झोपलेल्या माणसाने माझी ही दयनीय अवस्था बघितली असावी. तो माझ्यापाशी आला आणि करूणापूर्ण आवाजात "यह लो..." म्हणत मला त्याच्याकडची एक चादर देऊ केली. तेव्हा इतकं अपराधी मला कधीच वाटलं नव्हतं.

त्या चादरीने माझी हालत फार काही सुधारली नाही... महत्प्रयासाने ती रात्र पार पडली.

------

आठवीत असताना, कुठल्यातरी प्रकल्प स्पर्धेत भाग घेतला होता. (त्या काळी केलेले सगळे प्रकल्प एक से बढकर एक असत.) आम्ही तिघे मित्र citrus fruits च्या सालींपासून वीजनिर्मिती करत होतो. प्रकल्पाचं सारं काम प्रशालेच्या वेळातच चालायचं. एक दिवस बाईंनी सांगितलं -- जा असल्या साली वगैरे मिळवून आणा. एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली अन् आम्ही निघालो. रस्त्यावरच्या फळविक्रेत्याकडून त्यांचा साठलेला कचरा त्या पिशवीत टाकू लागलो. हळूहळू रस्त्यावरच्या बाकीच्या गोष्टी नाहीश्या होऊन फक्त असला पौष्टीक कचरा आम्हाला दिसू लागला. आमची पिशवी सुद्धा फुगू लागली. फिरता फिरता आम्ही आप्पा बळवंताच्या चौकात आलो. आणि तिथे कुठे काही मिळतय का ते बघू लागलो. आमचे कपडे वगैरे सगळे ठीकठाक होते.

समोरून एक चिमुरडी तिच्या आईबरोबर जात होती. आमच्याकडे बोट करून आईला म्हणाली:

"आई, ती बघ कचरा गोळा करणारी मुलं ...!"

------

`टप्पा` हा संगितप्रकार ऐकला आहेत कधी?

------