त्या किड्याच्या स्मरणार्थ

बापटाने परवा त्या मांजराची आणि किड्याची आठवण करून दिली आणि सोबत मीच लिहीलेली मेल मलाच परत पाठवली. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी तत्कालीन प्रिय मित्र-मैत्रिणींना लिहीलेली हीच ती मेल:

"नमस्कार,
काल चहा प्यायला सीसी कँटीन ला गेलेलो असताना एक मौज बघायला मिळाली. ( फोटोज्‌ सोबत जोडलेले नाहीत. )
तर, सीसी कँटीनच्या आसपास एक मांजराचे पिलू हल्ली असते. म्हणजे ते फार काही "पिल्लू" नैये, त्याची अंगकाठी जराशी लहान आहे इतकच. वयाने बऱ्यापैकी मोठं असावं. पण अजून चंचल आहे. पण मुद्दा तो नाही.
तर, त्याला प्रचंड भूक लागली असावी. कारण कचऱ्याच्या पेटीत उतरून तिथले खाण्याइतपत ते "गिरलेले" ( गिरे हुए ) मांजर होते. त्याला जवळच मेलेला एक "कुरकुरीत किडा" दिसला.
त्याच्या चेहऱ्यावर अशक्य सही भाव उमटले. ( इथे खरं म्हणजे आमच्या एका मित्राचं एक स्पेसिफिक इमोशन डोळ्यासमोर आणायचं आहे, पण ब्लॉगवर सार्वजनिक वावर असल्यामुळे तो तपशिल गाळण्यात आलेला आहे. )
मग त्या मांजराने तो मेलेला किडा फाऽऽर भाऽऽरी आवाज करत चावून चावून खाल्ला. ( ते बहुतेक आज ओकेल अशी अपेक्षा आहे. )
तो "कुर्रुम कुर्रुम" आवाज ऐकून मला बिस्कीट खावेसे वाटले, पण पैसे नव्हते.
पण मला आता सर्दी झाली आहे, म्हणून थांबतो!
- शंक्या.
"

दोस्तलोग, ते मांजर तेव्हा खरंच लहान होतं, ते आता चांगलच मोठं झालं आहे आणि त्याला तुमची खूप खूप आठवणही येते.