भय इथले संपत नाही

अंधारलेल्या दिवाणखान्यात आजोबांच्या रेडियोवर "भय इथले" लागलं. शब्द कळत होते, पण अर्थ लागत नव्हता. नुसत्या सुरावटीनीच विचार सागरावर वादळं यायला लागली. दोन वर्ष झाली आज आपल्याला भेटून. गेल्या एका तपातील ही येवढी एकच भेट. पोत्यात बांधून वेशीवर सोडून आल्यावरही निगरगट्टपणे परत येणा-या लाडक्या मांजरीसारखी ती एक सोनेरी आठवण.
भय इथले संपत नाही, मग तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते...
हे झरे चंद्रसजणांचे, ही धरती भगवी माया,
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया...
विश्वोत्पत्तीच्या वेळी आपले अणु-रेणू अगदी जवळ जवळ होते, ह्याचा मला आज कोण आनंद होतोय म्हणून सांगू! अजून कोट्यवधी वर्षांनी त्या भास्कराच्या पोटी आपली राखही एकत्रच असेल कदाचित. केवढी ही आशा, अन् केवढी ही उपेक्षा! सगळ्या शक्यता संपून जेव्हा फक्त आशा उरतात ना, तेव्हा संध्याकाळ झाली समज. ह्या सगळ्या आशा खरोखरच वांझ निघतील ह्याची अफाट भीती वाटते बघ!
तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शूनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला...
रघुनंदनाचा वास असलेल्या त्या वस्त्राचं सीतामाईने कितीक वेळा अवघ्राण केलं असेल! तुझं येवढसं छायाचित्र केव्हापासून जपून ठेवलंय मी. अतिशय तेजस्वी असं तुझं रूप आणि "कमले कमलोत्पत्ति:" प्रमाणे भासणारे तुझे सुरेख नेत्र. येवढी आभा उधळशील तर संपून जाशील गं क्षणार्धात! किती गोष्टींची भीती बाळगायची? त्या दिवशी तू आल्याची वर्दी अचानक कोणीतरी दिली, तेव्हापासून नवा जन्मच सुरू झालाय माझा. म्हटलं ना, आठवणी मांजरीसारख्या असतात म्हणून. इतके दिवस प्रेमानं आंजरल्या-गोंजारल्यावर कसं गं ह्यांना आपल्यापासून दूर करायचं?
स्तोत्रात इंद्रिये अवघि, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे...
परत भेटशील कदाचित ह्या आशेने मी जातो आजही तिथे. काळ्या मातीतून सोनंही पिकवून देणारा मत्सखा हस्ताचा पाऊस पडत असतो. शरदाची थंड संध्याकाळ असते. टपो-या शुभ्र फुलांनी सगळ्या वाटा फुललेल्या असतात, आणि त्यांच्या मंद सुगंधाने अवकाश भरलेलं असतं, अश्या एखाद्या "संध्याकाळी" मुळीच रहावत नाही बघ... देव असतो की नसतो माहीत नाही. नसतोच बहुधा. पण योगायोग स्वरूपी बापाचं आणि तुझ्या पदस्पर्शानं पुलकित झालेल्या त्याच्या देवळाचं अस्तित्च कोण नाकारणार? काळ्या संध्याकाळी सोनेरी आशेनं उजळलेल्या त्या गाभा-यापाशी पोहोचेपर्यंत माझं मन सैरभैर होवून जातं. सारी ज्योत्स्ना कृष्णमेघांमध्ये लुप्त झालेली असते, मात्र हळूच ओंजळीआड गेलेल्या माझ्या पापण्यांच्या ऐलतीरावर मात्र एकाच तारकेचा शुभ्र प्रकाश पडलेला असतो...
परत भेट नाहीच ना आपली?
भय इथले संपत नाही...

6 comments:

Gayatri said...

!

Mandar Gadre said...

फार फार राजस लिहिलंयंस! ग्रेसांच्या ओळींशी गुंफण नाजुक जमलीये: लिखाण आणि ओळी - काय कशावर बांधलंय ते न कळावं अशी :)

Bipin said...

as Gayatri said, !

Sachin said...

sundar :)

yog said...

speechless!

priyanka said...

Nice!