मृत्यू

मृत्यू

१४ सप्टेंबर २००८, इलाहाबाद

ह्या शहरात उतरलो, तेव्हापासून श्वास छातीतच अडकून राहिला होता जणू. एक गोष्ट मनासारखी होईना. बरोबर चुकीचा मुहूर्त निवडला होता आम्ही बहुतेक. हॉटेल मध्ये एका रात्रीसाठी रुम घेतली होती. रुम मिळाली खरी, पण ब-यापैकी अंधारी होती. एकच रात्र रहायचं होतं, आणि उगाच पैसे खर्च करण्यात अर्थ नव्हता म्हणून जी मिळाली ती घेतली. जेवायला बाहेर पडलो, तर एका टपरी वर ४० रुपयात अती भंगार जेवण मिळालं. नंतर कळलं पुढे अजून चांगल्या खाणावळी होत्या म्हणून. का कुणास ठाउक, पण कधी एकदा उद्याची परीक्षा संपवून निसटतोय असं झालं होतं मला. रात्री कायतरी उजळणी केली, आणि झोपलो. परीक्षेसाठी आधिच खूप तयारी केली होती त्यामुळे रात्री खूप शीण आला होता. एखाद्या नवीन भेटलेल्या व्यक्तिबद्दल उगाचच विचित्र वाटतं ना, तसं वाटायला लागलं होतं मला ह्या शहराबद्दल. सकाळी उठलो, थोडस काहीतरी जे मिळालं ते खाल्लं आणि परीक्षा जिथे होती तिथे जायला निघालो. रेल्वे स्टेशन ओलांडून दुस-या बाजूला जायचं होतं. थोडासा ताण आला होताच. सहाजिक आहे, परीक्षा तिथे ताण! आम्ही foot-over-bridge चढत होतो आणि वर पोहोचायच्या थोडं आधी काही माणसं दिसली. त्यातल्या एकाने दुस-याला काही कपडे आणायला सांगीतले. आम्ही वर पोहोचलो, आणि एका क्षणात मेंदूला झिणझिण्या आल्या. समोर एका भिका-याचा अतिशय भयानक अवस्थेतला मृतदेह पडला होता. सुजून फुगलेल्या चेह-यातून सुजलेले डोळे बाहेर आलेले, दातात अडकलेल्या सुजलेल्या जिभेतून बाहेर पडणारं थिजलेलं रक्तं. अतिशय कळकट्ट सर्वांग, रक्त आणि घाण यातला फरक न समजण्याइतकं. माश्याही जवळ जात नव्हत्या... त्या नरक-दृश्यापाशी देहाची विल्हेवाट लावायला जमलेले ४-५ लोक... दोन क्षणात माझी जणू दातखीळ बसली, पोटात किंचीत ढवळायला लागलं, शरीरातील रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब लागला... खूप कष्टाने परीक्षेवर परत लक्ष्य केंद्रित केलं आणि तिथून आम्ही पळ काढला... ३ तासांनी परीक्षा संपली. परत एकदा त्या ठिकाणावरून जाताना नाडी आधीच वाढली होती... मात्र आता सगळं जैसे थे होतं...

*****

८ नोव्हेंबर २००८, दिल्ली

नवीन शहर, नवीन परीक्षा. उघड्या डोळ्यांनी दिल्ली बघण्याची ही माझी पहिलीच वेळ. सकाळी पावणेबाराला परीक्षा संपली आणि पुढे पूर्ण दिवस मोकळा होता. नाहीतरी कानपुरला परतायला ७ तास लागतातच, मग आम्ही ठरवलं की पूर्ण वेळ दिल्लीत घालवून प्रवास रात्रीवर टाकूयात. परीक्षा संपताच हॉटेल मधून चेक-आऊट केलं आणि फिरायला बाहेर पडलो. आधी पराठ्यांचं भरपेट जेवण केलं. दिल्लीत सगळंच महाग वाटलं. अगदी फालतू गोष्टींवरही बरेच पैसे खर्च होत होते आमचे. दुपारी आम्ही कनॉट प्लेस ला आलो. प्रत्येक वळणावर, अक्षरश: प्रत्येक वळणावर बरीस्ता नाहीतर कॅफे कॉफी डे, झालंच तर पिझ्झा हट वगैरे दिसत होतं. अश्या ठिकाणी खिशातल्या हिरव्या नोटांचं काही मोलच उरत नाही. आम्ही खूप वेळ कनॉट प्लेस, पालिका बजार वगैरे च्या घिरट्या घातल्या. कदाचित धुकं आणि धुरामुळे असेल, पण त्या दिवशी वातावरण जरासं उदासच होतं. संध्याकाळ पडू घातली होती. आणि प्रत्येकाच्या खाण्याच्या आवडीनुसार आम्ही दहा-पाच दुकानं एव्हाना पालथी घातली होती. एकंदरीतच बरेच सुखवस्तू लोक, फिरंगी वगैरे जनता होती. तेव्हाच, शुभ्र कागदावर एकच काळा डाग असावा तशी ती भिकारीण आम्हाला दिसली. तिच्यासमोर एक मूल पालथं निपचीत पडलं होतं. मेलेलं असावं. त्या भिकारणीचा स्वत:वर ताबा नव्हता. तिला वेड लागलं असावं. त्या भयानक दृश्यात डोळे मिटून घेण्याचंही भान मला राहिलं नव्हतं...

*****

इतकी का रे अवघड तुझी भाषा, कर्मा?

No comments: