Helpless

Goldy, with a heart full of dismay,
prayed... to have with her one more day,
      God, looking unto the poor creature,
      replied with a roar of cruel laughter:
"Neither of us cares about you, anyway!"


(ह्या ब्लॉगसाठी मला काहीही नाव सुचलं नाही.)


आज सकाळी उठून आंघोळ केली आणि काही तरी नविन केल्याचा भास झाला. (हे साफ खोटं असलं, तरी पण सुरुवातीचं वाक्य म्हणून बरं आहे, नाही का? (हे = नविन केल्याचा भास होणे हे. आंघोळीचं नव्हे.)) (त्याचं काय आहे, एक तर ब-याच दिवसांनी लिहायला घेतलंय, आणि वेळ पण रामराया जन्मला त्या टळटळीत दुपारच्या नंतरच्या तेराव्या तासाची आहे. (हे मात्र साफ... खरं आहे!) (मला रात्री जन्मलेली कोणी महान व्यक्ती आठवली नाही, आणि "किर्र रात्र" वगैरे लिहिलं असतं तर उगच हॉरर ब्लॉग आहे की काय असं वाटून काही लोकांनी सोडून दिला असता! (हल्ली ब्लॉग्सला वाचक मिळत नाहीत म्हणे! (निदान आमच्या ब्लॉगला तरी!))))... बरेच कंस झाले नाही का? (ह्या प्रश्नाचं उत्तर "हो" असं देणार असाल तर थांबा. (थांबा म्हणजे, ब्लॉग पूर्ण वाचून होई पर्यंत थांबा, वाचणं थांबवू नका. (म-हाटी लोकांची काही ग्यारंटी नाही, त्यातून पुणेकरांची तर मुळीच नाही.)))

तर!, हा ब्लॉग मी एक महीन्यापूर्वीच लिहिणार होतो. त्यावेळेस परीक्षा चालू होत्या ना! (आम्हाला हा नसता टाईमपास अश्या भलत्यावेळीसच सुचायचा!) त्यामुळे एकीकडे स्वत:चा अभ्यास , दुसरीकडे डोळ्यात चिकार झोप, तिसरीकडे एकदम "शंक्रोनाईझ" झालेले ज्युनियर्स आणि वर्ग मित्र (ज्या दिवशी हे सगळं लिहावं असं सुचलं त्याच दिवशी पहाटे (हा कंस उगच घातलाय. ब-याच वेळात कंस झाले नाहीत म्हणून. (आता इथेही मला एक पी. जे. सुचलाय, ओळखा बघू कुठला? (उत्तर: ब-याच वेळात = कृष्णाने वध केल्यापासून. खी: खी: खी:))) एका मित्राने एक जोक सांगितला: म्हणे "खूप लोक एकदम शिंकले तर त्याला काय म्हणशील? .... सोप्पय! (मी "हरलो बुवा" म्हणण्याचा सोपस्कार पार पाडल्यावर तो "सोप्पय" असं म्हणाला) शिंक्रोनाईझ" ... तर तसच "शंक्रोनाईझ" म्हणजे "सिंक्रोनाईझ" होऊन "शंका" विचारणे होय.) अश्यात तो सुचलेला ब्लॉग लिहायचा राहूनच गेला. (बाय द वे, हे असं मधून-मधून ईंग्रजी शिंपडलेलं चालतं ना तुम्हाला? (ह्या प्रश्नाचं उत्तर "नाही" असं देणार असाल तरी माझं काय जातंय? डोंबल!))

मला आता थोडी शंका यायला लागलीये, की नक्की मला त्या दिवशी काय नि किती सुचलं होतं? कारण इन-मिन फक्त दोनच परिच्छेद भरलेले दिसताहेत मला! (आणि हा तिसरा, त्यातलाही पहिला "बळच" आहे (खरं म्हणजे सगळा ब्लॉगच "बळच" आहे.)) खरा ब्लॉग कुठे सुरू होऊन कुठे संपतोय काही पत्ताच नाही. (एखाद्या ब्लॉग मध्ये त्याच ब्लॉग बद्दल बोललं की असंच होतं. (हा "सेल्फ रेफरन्स" पाहून ग्योडेल त्याच्या थडग्यातून नाचत नाचत उठेल (तुम्हाला तर्कशास्त्र येत नसेल तर "ह्या" कंसाच्या बाहेरील एक कंस सोडून द्या प्लीज.)))

पण आता खरंच अतीच कंस झाले. गेले काही महिने ब-याच भावना मी अश्याच कंसात गच्च मिटून ठेवल्या होत्या. पण मित्रहो, माझ्याप्रमाणे तुम्हालाही एक दिवस कळेल, की कंसात फक्त नेपथ्य आणि पटकथा असते. खरी गम्मत तर बाहेरच असते, नाही का?

(माझ्या ब्लॉगचे शेवट आवडत नाहीत, असं काही जण म्हणाले होते मला एकदा... :)