॥कोप राग॥

राग, आग, कोप डंख,
अंग, अंग - भंग भंग.
आजचा हा रंग लाल,
तप्त लोह - गाल, भाल.

ध्य, मंद्र, तार तार,
आरडणार, ओरडणार.
नाभीतून चीतकार,
मुखी फक्त "भ"कार.

दळ-आपट - खाड्‌, खाड्‌,
वही, कागद - फाड, फाड!
हृदय, नाडी - ताड्‌, ताड्‌,
तडित्‌ जशी कडाड्‌, कडाड्‌!

...म... दमलोऽऽऽ
प...ड... पडलोऽऽऽ
जीभ तरीही बोलणार,
"यल्गाऽर, यल्गाऽर"!

---

(कविता जमली नाही की असं होतं. कवितेचं अन्‌ माझं, दोघांचही)
अकिलीज आणि टॉर्टॉईज काय म्हणाले

[ आज अकिलीज आणि टॉर्टॉईज ची शर्यत आहे. अ. नेहमी प्रमाणे पहाटे उठून, ताजा तवाना होऊन, एकदम जोशात आला आहे. तिकडे टॉ. पण तयार होऊन आलाय. मात्र तो अगदी तल्लिन होऊन वर्तमानपत्रातलं राशीभविष्य वाचत बसलाय. त्याच्या राशीचं आजचं भविष्य बघून तो मधूनच "आं!", "भारीच!", "अरेरे" वगैरे भावोद्गार काढतोय. त्याला पाहून अ. चकित होतो. ]

"अरे टॉ.,  तुला वेड-बिड नाही ना लागलं? मागच्याच वेळी मला तू तर्कशास्त्रातले धडे देत होतास, आणि हे आज राशीभविष्य काय वाचत बसलायस? अजून दोन हजार वर्षांनंतर तुला लोक हुषार म्हणून नाही तर येडा म्हणून ओळखतील". अ. हसत हसत म्हणाला.

टॉ. ने सावकाश डोकं वर काढलं. "अरे मित्रा, गेले शंभर दिवस मी रोज हे भविष्य वाचतोय आणि ते अगदी बिनचूक खरं ठरतंय बघ. थांब तुला नीट सगळं समजावून सांगतो. माझा आजचा दिवस खूप छान जाणारे." टॉ.

"अरे पण शंभर दिवस खरं ठरतंय म्हणून आज खरं ठरणार कशावरून?" अ. चा सालस प्रश्न.

टॉ. च्या चेह-यावरचे भाव अचानक बदलले आणि तो किंचाळून म्हणाला: "अरे इथे काय लिहीलयं बघ: ’विश्वाचं उद्याचं भविष्य: उद्या सूर्य उगवणार नाही’ !"

"काय???" ते ऐकून अ. चे धाबे दणाणले. "क्याय पण. टॉ, तू असला फाजील पणा सोडून दे बघू. सकाळी सकाळी नसता फालतूपणा. सूर्य उगवणार नाही असं कधी होईल का? रोज उगवतो तसा उद्या पण उगवणारंच!"

"का? का? का? तुझ्या जन्मापासून तू त्याला रोज उगवतांना बघतोयस म्हणून उद्या पण उगवणार कशावरून?" टॉ. अ.ची नक्कल करत म्हणाला.

"अरे म्हणजे तसं नाही रे, पण मला माहितीये, सूर्यात अजून खूप ईंधन शिल्लक आहे म्हणून." अ.

"हं. तेही खरंच म्हणा. पण भौतिकशास्त्राचे सगळेच्या सगळे नियम उद्याच्या उद्या कोलमडून पडणार नाहीत कशावरून? जे नियम आज लागू आहेत, तेच उद्या लागू रहातील असं आपण गृहित धरलंय. ते गृहितकच खोटं असेल तर?" टॉ.

"हां रे, खरंच की! हा विचारंच केला नाही मी!!!" अ. अस्वस्थपणे म्हणाला. उद्या भौतिकीचे सगळे नियम बदलले, आणि युद्धाला जाताना त्याची बोट समुद्रावर तरंगण्याच्या ऐवजी गपकन्‌ बुडाली तर काय ह्या विचाराने त्याला शहारा आला. शेवटी न रहावून तो म्हणाला, "जाऊदे रे टॉ., विषय बदल. तू काहीही म्हण, पण त्या ता-यांचा आपल्या जीवनाशी काही संबंध असेल असं नाही वाटत मला. म्हणजे बघ ना... किती दूर आहेत ते आपल्यापासून!"

फट्ट! तितक्यात तिथे बुध्दीची देवी अथेना प्रकट झाली. टॉ. ला झटकन एक कल्पना सुचली आणि त्याने अथेना ला त्यांच्या ज्ञानात भर घालायची विनंती केली. अथेना म्हणाली, "टॉ. आणि अ., मी तुम्हाला एक दृष्टांत देते. टॉ, तुझी बुध्दी योग्य निर्णयाप्रत पोहोचायला समर्थ आहे!" आणि तिने त्या दोघांना हात लावताच ते दोघं आजच्या जगात आले. ते पोहोचले थेट अमेरिकेत. त्यांना तिथे एक भारतीय माणूस ("क्ष") कुठल्याश्या पडद्यासमोर बसून दुस-या एका व्यक्तिशी ("य") बोलतोय असं दिसलं. एका क्षणात अथेनाने त्या दोघांना हात लावला आणि ते भारतात पोहोचले. त्यांना तिथे "य" एकदम जशी अमेरिकत दिसली तशीच दिसली. अथेनाने परत त्यांना हात लावताच ते वर्तमानात परत गेले.

भानावर येताच अ. चं डोकं जाम गरगरायला लागलं. "अरे टॉ. हे कसं काय रे? "य" एकदम जशीच्या तशी "क्ष" ला कशी काय दिसत होती रे? ते तर किती दूर आहेत एकमेकांपासून! आणि अमेरिकेतून कळ दाबली की त्या भारतातल्या पडद्यावर कसाकाय फरक पडतो रे?"

"हा हा हा! बघ! अन्‌ तू म्हणतोस आपला अन्‌ ता-यांचा काय संबंध!" टॉ. मिश्किलपणे उद्गरला.

अ. च्या चेह-यावर एक मोट्ठ कोडं सुटल्याचा आनंद पसरला. दोन क्षण शांततेत गेले.

टॉ. आता एकदम उत्तेजित झाला होता. "अरे तुला माहितीये का अ., मध्ये एकदा मला माझ्या मैत्रिणीने राशी आणि लोकांचे स्वभाव ह्यावरचं एक पुस्तक वाचायला दिलं होतं  [१]. त्यातल्या वर्णंनांचे बरेचसे भाग किती तंतोतंत खरे आहेत हे बघून झीट येईल तुला. बघणारंच असलास तर माझी रास कन्या आहे. वाच त्यातलं वर्णन."  अ.ने अधाशासारखं ते वाचून काढलं.

त्याचं वाचून होताच: फट्ट! परत एकदा अथेना प्रकट झाली. ती प्रचंड घाईत होती. अथेना म्हणाली, "टॉ. आणि अ., मला तुमची मदत हवी आहे. भविष्यात मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. मला अशी आशा आहे की तुम्ही त्या लोकांना नक्कीच मदत करू शकाल. मला आत्ता झूस ने पाचारण केलेल्या देवतांच्या सभेला हजर रहावं लागणार आहे. सूर्याची काहीतरी गफलत होणारे म्हणे. म्हणून मी तुम्हा दोघांना भविष्यात सोडते आणि मग २ दिवसांनी परत घ्यायला येते." आणि तिने झटकन दोघांना हात लावला. पट्कन ते आजच्या जगात पोहोचले.

ते पोहोचले डबघाईला आलेल्या एका मोठया बँकेत. तिथे नुसती पळापळ सुरू होती. टॉ. आणि अ. कडे बघायला लोकांना वेळ देखिल नव्हता. शेवटी अ. ने जोरदार आवाजात त्याच्याकडचं रणशिंग फुंकलं. आणि सगळ्या लोकांनी एकदम त्यांच्याकडे माना वळवल्या. जाता जाता अथेनाने पटकन तिचा हात वेडावाकडा फिरवला आणि ‘कासव व योद्धा’ ह्या विचित्र जोडीला ला बघून विस्फारलेले लोकांचे डोळे पूर्ववत झाले. टॉ. ने लोकांना सगळं काही नीट समजावून द्यायला सांगितलं.

तिथल्या लोकांचा म्होरक्या उठला आणि त्याने अ. आणि टॉ. शी हस्तांदोलन केलं. त्याने त्याच्या सगळ्या पदव्या बिदव्या सांगायला सुरूवात केली. त्यातली एक MBA सोडून बाकी सगळ्या टॉ. ला समजल्या. पण असेल काहीतरी म्हणून त्याने जास्त प्रश्न विचारले नाहीत. तर त्या म्होरक्याने मूळ मुद्दा सोडून अत्यंत अलंकारीक ईंग्रजीत आमचीच बँक सर्वात चांगली होती तरीही अशी परिस्थिती झाली वगैरे वगैरे पाल्हाळ लावायला सुरूवात केली. आता टॉ. ला MBA चा अर्थ नीटच समजला आणि त्याने तिथल्या एका दुस-या MBA न केलेल्या माणसाला सूत्र हातात घ्यायला सांगितली. तो माणूस पटकन मुद्‌द्‌यावर आला.

"त्याचं असं आहे बघा" त्याने सुरुवात केली. "आम्ही लोकांना कर्ज देतो. मात्र कर्ज द्यायच्या आधी त्या माणसाची कर्ज परत फेडण्याची कुवत आहे की नाही ह्याचा अंदाज बांधतो. त्या माणसाने आधीची किती कर्ज फेडली आहेत, त्याचं उत्पन्न किती वगैरे पन्नास निकष आम्ही वेगळे काढले आहेत. प्रत्येक निकषाचे त्या माणसाला १-१० मधले गुण मिळतात. आता आमच्याकडे आधीच हजारो ॠणकोंची माहिती उपलब्ध आहे. आणि त्यांना कर्ज देणं आम्हाला कितपत फायदेशीर ठरलं होतं हे आम्हाला माहीत आहे. म्हणजे गणिताच्याच भाषेत सांगायचं तर आमच्याकडे एक मोठा तक्ता आहे. त्यात प्रत्येक ओळीवर एकेका व्यक्तिची माहिती आहे. प्रत्येक स्तंभ एकेक निकष दर्शवतो, आणि सगळ्यात शेवटचा स्तंभ हा त्याने आम्ही दिलेलं कर्ज फेडलं की नाही, अर्थात आम्हाला झालेला फायदा/तोटा (१/०) चा आहे. उदाहरणादखल हे बघा:"

व्यक्ति १    (आधिची कर्ज फेड) गुण, (उत्पन्न) गुण, ....... , (फायदा) .
व्यक्ति २   (आधिची कर्ज फेड) १० गुण, (उत्पन्न) गुण, ....... , (फायदा) .

वगैरे वगैरे. आता ह्या माहितीशी सगळ्यात जास्त जुळणारं एक function आम्ही शोधून काढतो, ज्यात आम्ही एखाद्याला वेगवेगळ्या निकषांवर मिळालेले गुण टाकले की ते function आम्हाला त्या माणसापासून होणारा अपेक्षित फायदा/तोटा दर्शवतं [२]. असंच करत करत आम्ही लाखो लोकांना कर्ज देऊन बसलो. सगळ्यांकडून आम्हाला अपेक्षित नफाच होता, पण दुर्दैवाने सगळ्यांनी आम्हाला बुडवलं."

टॉ. ने एकदम टाळी वाजवली, आणि म्हणला, "म्हणजे तुम्ही भविष्य भविष्य खेळताय तर!"

लोकांनी एकसुरात "क्का‌‍ऽऽऽयऽऽऽ?" चा गिल्ला केला. टॉ. ने लोकांना शांत केलं आणि सुरुवात केली. "माझा काका मोठा भविष्यवेत्ता होता. त्यानी काय केलं, सर्वप्रथम आकाशाचे दहा भाग पाडले. आणि मग सतत पन्नास वर्षं, दर रात्री, त्याला माहित असलेले ग्रह आकाशाच्या कुठल्या भागात आहेत ह्याचा आकडा लिहून ठेवायला सुरुवात केली. आणि मग दुसरा दिवस त्याच्यासाठी कसं जातोय म्हणजे आनंदी(१)/दु:खी(०) हे तो आदल्या दिवशीच्या ओळीत लिहून ठेवायचा. बघा हं कसं ते:

रात्र १    (ग्रह १) , (ग्रह २) , ..... , (पुढचा दिवस कसा गेला)
रात्र २   (ग्रह १) , (ग्रह २) , ..... , (पुढचा दिवस कसा गेला)

वगैरे वगैरे. मग आता त्याने अगदी तंतोतंत तुमचीच पद्धत लावली आणि स्वत:चं एक ज्योतिषशास्त्र तयार केलं. म्हणजे आजची ग्रहांची स्थिती सांगितली की उद्याचा दिवस कसा जाणार हे त्याला कळायचं. पण झालं असं, की सतत पन्नास वर्ष हा उपक्रम करून त्याचा बुद्धिभ्रंश झाला आणि त्याने शोधून काढलेलं function आता कोणालाच माहीत नाही. तो माझ्याशी थोडं थोडं बोलायचा म्हणून त्याचे काय उद्योग चालू आहेत हे मला कळलं तरी."

लोकांच्या डोक्यात प्रकाश पडायला थोडा वेळ लागला. पण त्यांना टॉ. चं बोलणं पटलं. त्यांच्यातल्या एकाने तर दोघांना साक्षात लोटांगण घातलं. अन्‌ म्हणाला, "मी तुमची ग्रीक पुराणं वाचली आहेत. त्यात एके दिवशी सूर्यच उगवला नाही अशी अख्यायिका आहे, होय ना? सगळी कडे अंधाराचं साम्राज्य होतं. काय भयानक दिवस असेल नाही तो? आमची पण अगदी तश्शीच अवस्था झाली होती. काय मार्गच दिसेना. पण तुम्ही आम्हाला मार्ग दाखवलात. आता मी हा सगळा धंदा सोडून सरळ शेती करायला लागणार आहे. जगात तेवढ्या एकाच गोष्टीचा लोकांना उपयोग होऊ शकतो."

त्यानंतर अ. ने जमलेल्या सगळ्यांना धैर्याचे डोस पाजले. आणि लोकांनी टॉ. आणि अ. चा जयजयकार केला. थेट प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याचा खातमा केला म्हणून टॉ. ला "A-Kill-Ease" आणि अ. ने सगळ्यांना धीर दिला म्हणून "Taught-Us" अशी प्रेमानी टोपणनावं देण्यात आली.

पुढचे दोन दिवस अ. आणि टॉ. ने भविष्यातली अजब दुनिया बघण्यात घालवली. आता अचंभित होण्याची पाळी त्यांची होत. आणि दोन दिवसांनी ते वर्तमानात परत आले. दुर्दैवाने सूर्य नसलेला दिवस त्यांना कधीच बघायला मिळाला नाही. त्यांची अर्धवट राहिलेली शर्यत अ. जिंकणार हे नक्कीच असल्याने टॉ. ने आधीच प्रामाणिकपणे हार कबूल केली.

कित्येक दिवसांनी परत एकदा टॉ. एका प्रसन्न सकाळी भविष्य वाचत बसलेला बघून अ. ला खुदकन हसू आलं आणि तो म्हटला, "त्या बँकेतले लोक काय करत असतील रे आत्ता?"
"पैजेवर सांगतो, अर्धे लोक शेतकरी आणि उरलेले अर्धे ज्योतिषी झाले असणार!", इति टॉ.

---

[०] "What the Tortoise Said to Achilles" ह्या Lewis Carroll च्या उता-यावर आधारीत. Lewis Carroll, Achilles आणि Tortoise शी माझी गाठभेट घालून दिल्याबद्दल Douglas Hofstadter ह्या लेखकांचे शतश: आभार.
[१] ^ http://www.cyberspacei.com/englishwiz/library/names/zodiac/contents.htm ही लिंक मला पाठवल्याबद्दल गंधाली चे आभार.
[२] ^ ह्या पद्धतीला Multinomial Logistic Regression असं नाव आहे.
हातात हात

[आज खूप लिहायचंय. आज खूप बोलायचंय. आणि आजच साले शब्द हरवलेत.]

पहाट झाली. डोळे किलकिले करून बघितले तर सगळा प्रदेशच नवा. कुठली तरी भैताड वेळ, कुठली तरी भैताड जागा. खूप वर्षांपूर्वी आमचा वाडा होता. अगदी पुण्याच्या हृदयात. घरात चिकार माणसं होती. आजी, आजोबा, चुलत आजी, चुलत आजोबा, आत्या, आमची सगळी मांजरं, एक छोटंसं कासव सुद्धा! वाडा पण झकास होता अगदी. एकदम गोष्टीतल्या सारखा. मोठ्ठं अंगण होतं, आंबा, फणस, रातराणी ची झाडं होती, आणि संडास ला जायचा एक जाम भीतीदायक रस्ता पण होता. अशा वाड्यात आमची कधीतरी मस्त मैफल जमायची. सगळे आजी आजोबा, आत्या, आई, बाबा, मी असे दुपारचं जेवण उरकून अंगणात पत्ते खेळायला बसायचो. जेवणाचा बेत पण कसा? आबांच्या हातच्या फुफाट्यात भाजलेल्या वांग्याचं भरीत मला अज्जून आठवतं. पत्ते खेळतांना मला नेहमी लहान म्हणून फक्त पत्ते टाकायचं काम मिळायचं. तेव्हा मला फार राग यायचा. ३०४ खेळतांना भंगार डाव आला की आबा नेहमी चिटींग करून सगळे पत्ते उपडे करून डाव "ओम्‌ फस्‌" करायचे. उगच चिडी खेळण्यात तर आमच्या घरचे पटाईत! कोण जिंकायचं कोण हरायचं वगैरे मला आता काही आठवत नाही. ह्या सगळ्या गोष्टींना चिकार वर्षं झाली. मध्यंतरी देव म्हटला, मला पण तुमच्यात खेळायला घ्या, आणि त्याने आमच्यातले बरेच हात ओढून घेतले. आता तो वाडाही गेला, संध्याकाळी अंगणात बसून स्वत:च्या हाताने गरम गरम वरण-भात भरवणारी आजीही गेली. माझ्यासाठी रोज न चुकता चिंच गुळाची आमटी करणारी चुलत आजीही गेली.

कधीतरी चांदण्या रात्री लाईट गेले की आईच्या मांडीवर डोकं ठेवून अंगणात रेडीयोवर गाणी ऐकायला किती अवीट मजा यायची! अगदी परवाच आई म्हणाली - खूप पैसे कमवून एखादा सुंदर वाडा विकत घेईन असा का नाही रे म्हणत तुम्ही?

हातात हात...

****

परवा राहुल ने पिंग केलं आणि म्हटला: "तुला सांगितलं का रे मी?" त्याला तिथल्या तिथे थांबवून म्हटलं - मित्रा, ह्यापुढे कधी चुकून सुध्दा वाक्याची सुरुवात अशी करू नकोस. हल्ली असल्या सगळ्या वाक्यांचा शेवट "माझं लग्न ठरलंय" ने होतो.

श्रावणातल्या दर रविवारी कशी आदित्य-राणूबाईची तीच तीच कहाणी परत परत सांगायची असते ना, तशीच एक ओरिजनल [उच्चारी "व्हर्जिनल"] कहाणी आमच्या कडे पण आहे. ह्या कहाणीची अगदी मागच्याच महिन्यात पुन:प्रचिती आली. जमलेल्या शंभर तरूणींमधली नेमकी आपल्याला मनापासून आवडलेलीच कशी काय "कमिटेड" निघते? एका उत्तराची कहाणी उलट सतराशे साठ प्रश्न घेऊन नेहमीच कशी निष्फळ आणि अपूर्ण राहते?

हातात हात, पिवळे हात...

*****

कोवळ्या थंडीत, चहाचा गरम्म कप दोन्ही हातात घट्ट धरून मारलेल्या गप्पा, "स्वीकार"ला "और एक कप" करत घालवलेल्या संध्याकाळी आता माझ्या आयुष्यात अजरामर झाल्या आहेत. पहाटे ११ वाजता मक्याला उठवलं की निमूट पणे डोळे चोळत MT ला चहा प्यायला यायचा. अन्‌ मग "दो इस्पेसल" ची ऑर्डर देऊन पुढचे दोन तास जगातल्या यच्चयावत गोष्टींवर चर्चा व्हायच्या. त्यात अगदी अश्लीलतम विनोदांपासून महाडोकेबाज कोट्यांपर्यंत सर्व वाङ्‌मय प्रकारांचा समावेश असायचा. एकदा मक्या म्हटला चहा जरा बोअर झालाय, आज उसाचा रस पिऊ. उसाचा रस सांगितला, तर २ मिनिटांत तयार झाला आणि पुढच्या १ मिनिटात पोटातही गेला. काय मजाच नाय. चहा सांगितला की तो यायलाच कसा अर्धा तास लागायचा. कारण "इस्पेसल" पिणारे फक्त आम्हीच. मग "राजकुमार"ला आमच्या साठी वेगळं आधण टाकायला लागायचं. मग कधीतरी तो चहा उगवणार, आणि मग शेवटी तो चहा आम्ही पिणार. तो एक लहानपणी प्रमोद नवलकरांचा धडा होता. "घंटा" नावाचा. त्यात त्यांना प्रश्न पडला होता की घंटा हा आपल्या जीवनाचा इतका अविभाज्य घटक असूनही अजून कोणी घंटेवर महाकाव्य कसं काय नाही लिहीलं? प्रमोदराव, पैजेवर सांगतो, घंटेआधी चहावर महाकाव्यं लिहीली जातील. कृष्णाने सुध्दा अर्जुनाला गीता सांगायच्या आधी सुमडीत "दो इस्पेसल" ची ऑर्डर दिली असणार, आणि मग निवांत पणे दोन हातात चहा चा गरम्म कप घट्ट धरून गीता-बिता सांगितली असणार. नक्कीच.

आता मात्र ते मैत्रीचे हातही कुठेतरी दूर राहिले...

*****

यमन रागातलं एक खूप गोड गाणं ऐकत बसलोय. आज खूपच थंडी आहे. त्यात पुन्हा पाऊस. बर्फही पडायचा कदाचित. काय सुरेख पेशकश आहे, दर कडव्यात षड्‌जाचं मृगजळ दाखवत गायिका कशी सगळ्या जगभर फिरवून आणतेय! आणि अगदी रहावेनसं झालं, की प्रत्येक कडव्याच्या शेवटी एक दीर्घ षड्‌ज येतोय...

हाताशी हात जोडून पुढच्या षड्‌जाची अत्यंत आतुरतेने वाट पहात हातांवरच्या चिरस्थायी रेषांचं कोडं सोडवत बसलोय.

हा यमन आहे. मारवा नाही. तो षड्‌ज येणारच.
किती गणितं सोडवतोस दिवसाला?

"ऐला! म्हणजे तुम्हाला परिक्षेत फक्त गणितं सोडवायची असतात?" दुपारी २ च्या अत्यंत शुभसूचक वेळी अमृताचा (निळी टोपी वाले ह्याला "चहा" म्हणतात) चषक हाती असताना, एका बेसावध क्षणी, एकीने मला फुलटॉस वर क्लीन बोल्ड केला. लोकहो, थांबा. हा प्रश्न वरवर जितका हास्यास्पद दिसतो, तितका बावळट मुळीच नाही. ह्याच्या मुळाशी गणित ह्या विषयाबद्दल समाजात असलेलं अज्ञान दडलेलं आहे. पोरगं गणितात PhD करतंय म्हटल्यावर लोक अक्षरश: चेकाळतात, आणि असे काही प्रश्न विचारतात, की विचारता सोय नाही! यंदाच्या सुट्टीत तर लोकांनी कहर केला. "काय मग, किती गणितं सोडवतोस दिवसाला?" अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला असलेली एक कन्या. "अख्खी पी. एच. डी भर तुम्हाला एकच गणित असतं का रे? शी किती बोअर!". "वा वा... म्हणजे कानडे’ज्‌ थियरम येणार आता पाचवी च्या पुस्तकात!" ही त्यातलीच काही सालस वाक्य. दुकानात गेलं, की "अरे हा ठेवील की हिशेब, गणितात आहे लेकाचा". भले! गेले पाच वर्ष मी एकही "मोठी बेरीज-वजाबाकी-गुणाकार-भागाकार" केलेली नाही ह्यावर विश्वासच बसत नाही लोकांचा. जरा शिकले सवरलेले, (विशेषत: JEE वगैरे साठी "Prepare" करणारे) तर अज्जूनही मला टॅनॉफ्कॉटॉफेक्स चं integral करून देतोस का वगैरे विचारतात. "तुझा फेवरेट नंबर कुठला रे?" ह्या ही प्रश्नाला मी सामोरा गेलोय. अहो हे तर काहीच नाहीये. "तुला हे सगळे थियरम्स खरे वाटतात का रे? मला की नै फक्त १०वी पर्यंतचेच खरे वाटतात बाई." आता बोला. है कोई जवाब? पण उपरोक्त सर्व जनता ही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात सरस असल्याने मी हे सगळं हसण्यावारी नेलं. मात्र एकदा मुंबई हून लखनऊ ला जाताना, आमच्या समोर बसलं होतं एक पात्र. ३० वर्षांचा घोडा झाला तरी साईड-अप्पर ही सामान ठेवण्याची जागा नसून झोपायची जागा आहे ह्याचं त्याला ज्ञान नसावं. (कारण त्याने तसं आम्हाला विचारलं देखील!) कोण कुठला करता करता मी त्याला सांगितलं गणित शिकतोय म्हणून. तर म्हणे बारावीला Integration होतं का तुम्हाला? म्हटलं हो. तर म्हणे, "मग आता काय राहिलय शिकायचं गणितात?" मी बदाबद तोंडाला येतील ते शब्द टाकले, मग चूप बसला.

तर अशी सगळी मजा. गणिताचं एक सोडा. पण कुठल्याही विषयात PhD करणं हाच एक खूप मोठा संशोधनाचा विषय ठरावा. आत्ता आमच्या पदवीदान समारंभाच्या वेळी एका केमिस्ट्री वाल्या बाबाने १३ शब्दी नावाच्या कंपाऊंड वर PhD केल्याचं आम्हास आढळलं. PhD वाल्या लोकांमध्ये ह्या महाभागाला सर्वाधिक टाळ्या पडल्या! त्याने पहिला महिना फक्त ते नाव पाठ करण्यात घालवला अशीही वदंता होती. लोक कशावरही PhD करतात. २००३-०४ मध्ये "सामना" मध्ये जे दैनिक राशीभविष्य यायचं[१] त्यानंतर सगळ्यात विनोदी म्हणजे सकाळ मध्ये येणारं "पी. एच. डी. चे मानकरी" हे सदर होय. प्रबंधाचं शीर्षक ४ ओळींपेक्षा कमी असेल तर देतच नाहीत वाटतं PhD. विषय पण महान. "हवाई बेटांवरील साहित्यावर हिंदू संस्कृतीचा प्रभाव" वर गडचिरोली विद्यापीठातून हवाई बेटांवर पाऊलही न ठेवता PhD.[२] आऽवराऽ! पण ज्यूरीतील सभ्य गृहस्थहो, विषय काहीही असला, तरी PhD ही PhD असते. तुमच्यासारख्या पैशाच्या मागे पिसाट सुटलेल्या भोगवादी, चंगळवादी संस्कृतीला नाही समजायचं ते.[३]

तर मुद्दा असा, की ५ वर्ष डोकेफोड करूनही हाती काय लागेल ह्याची शाश्चती नाही.म्हणून आम्ही आधीच "PhD जमली नाही तर काय?" ह्या प्रश्नाचा विचार करायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्र बोर्डाची सद्य:स्थिती बघता ५ वर्षांनी आम्ही प्रस्तुत लेखात निर्दीष्ट एकमेव कल्पनाचित्राप्रमाणे "गणिते सोडवून देण्याचा" धंदा सुरू करण्याच्या इराद्यात आहोत. तरीपण ४-५ (खडतर) वर्षांनंतर असा कुठला फलक शनिवार-सदाशिव मध्ये आढळला तर चमकू नका. आणि हो... एक राहीलंच. त्यावेळी ह्या लेखाचं कात्रण घेऊन येणारास खरे एक आणि जीवनाचे एक अशी दोन गणिते मोफत सोडवून देवू!
---
[१]. "आज पडदे बदलावेसे वाटतील." अरे?!
कळस - "आज कान कोरू नका." अहो, हे तर भविष्यही नाहीये!!!
[२]. नावं खरोखरंच बदलली आहेत.
[३]. इथे येऊन बघा. फुकट खाणं दिसलं की "Grad Students" कसे फॅमिली सकट येऊन बसतात ते. [४]
[४]. PhD करताना तळटीपा लिहीण्याचा सराव हवा म्हणे. म्हणून हा खटाटोप.

अरे हाड!

खो-खो हा खेळ मोठाच मस्तान. बघायला अत्यंत रोमांचक आणि खेळायला तितकाच अवघड. झनाट वेगाने सुरू असलेला अटॅक, चतुराईने दिलेल्या झुकांड्या, निडरपणे दोन दोन पाट्या मारलेल्या दिलखेचक डाईव्ज, हुशारीने पोल वर खेचलेले गडी, सटासट मारलेले पोल, सुसाट केलेले रश, तर कधी संथ गतीने बचाव करून "पाडलेला" अटॅक, बाहेरून जोशात केलेलं चियरींग, गडी मारल्यावर माजात केलेलं अपील, शड्डू ठोकून दिलेल्या खुनशी आणि अश्याच रोमांच आणणा-या कितीतरी गोष्टी.

खो-खो चं नाव जरी काढलं तरी माझ्या मनात कितीतरी आठवणी जाग्या होतात. डाईव्ह टाकली की माझ्या कमरेला उजवीकडे नेहमी जखम व्हायची. असंच खूप दिवस होऊन होऊन ती जखम जाम चिडकी झाली होती. जखम भरायच्या आतच परत फुटायची. त्या दिवशी अशीच प्रॅक्टीस चालू होती. आमचा आधी अटॅक होता. आमच्या टीमच्या फर्स्ट बॅचचा गडी बॅटींग करत होता. (क्रिकेट मधे बॅटींग = बचाव, हीच संज्ञा खो-खो मध्ये जशीच्या तशी उचललेली आहे.) आणि उरलेले आम्ही सगळे अटॅकला होतो. चतुरपणे त्याने आमचा पूर्ण अटॅक झोपवला होता. २ मिनिटं झाली, ३ झाली, आऊटच होईना. पोल मारावा तर हात भर लांबून पोल सोडायचा, अक्शन खो बरोबर स्पॉट करायचा. ४ मिनिटं झाली तरी कोणाच्या हातीच येईना. साधारणपणे पळणारा दमला की तो ट्रॅक वर पळणं सोडून चारच ऍटॅकर्सना घेऊन खेळतो, जेणेकरून दम-श्वास परत मिळवता येतो. आता त्याने असं चौघातलं खेळायला सुरूवात केली. जखमेमुळे मी आधीपासूनच डाईव्ह मारायला कचरत होतो. पण आता अती झालं. दैवयोगाने एकदा त्याने मला चौघात घेतलं. माझं चार पावलं "कव्हर" झाल्यावर त्यानं झटकन झुकांडी दिली अन्‌ तो आत गेला. तो अगदी जस्ट माझ्या टप्प्यात होता. मागून "शंक्या उड" असं कोणीतरी म्हणायच्या आतंच माझं रक्त कमरेच्या जखमेतून मेंदूत चढलं होतं, दिसत होते ते पळणा-याचे खांदे, अन्‌ कुठलाही विचार न करता पुढच्याच क्षणाला मी हवेत दोन फूट जमिनीला समांतर उडालेलो होतो. खेचलेले हात पळणा-याचा कमरेला लागले, मी जमिनीवर पडलो. मागून "मारलाय, मारलाय" च्या आरोळ्या उठत होत्या. शिट्टी वाजली.

जखमेवरचा कापूस निघून परत एकदा कंबर रक्ताळली होती. एकवार झोंबणा-या जखमेकडे बघून आपसूकच उद्गार निघाले: "अरे हाड!".

*****

You Can Win.

Monk Who Sold His Ferrari.

Self - Help books.

२१ अपेक्षित.

यशाची गुरुकिल्ली.

अरे हाड!

*****

हळूहळू उन्हाळा सुरू होत होता. गरम्म्म दुपारी, गरम्म्म वा-यात, गरम्म्म उन्हात जीव हैराण होवून जाई. ज्या बातम्यांसाठी कान तरसले होते, त्या तर दूरच राहिल्या, पण जे नको तेच भाग्यात येत होतं. अशा अवघड वेळी मला आधार दिला तो अमलतासाच्या सोन-बहराने लवडलेल्या झाडांनी. माजुरड्या उन्हाच्या थोबाडावर थुंकून त्याच्यापेक्षाही सरस रंगात रंगणा-या अमलतासाला मानला आपण. इतक्या उकाड्यातही भान हरपावं असा त्याचा पिवळा धोम रंग. पण अमलतास अन्‌ गुलमोहराची बातच और. रोज संध्याकाळी शेवटी कंटाळून सूर्य घरी धूम ठोकत असे, उद्या परत येईन तुझी जिरवायला म्हणून. अमलतास, लेका तू खरा तरूण आहेस. अरे कसल्या अडचणी आणि कसली संकटं रे? एकदा सणसणीत "अरे हाड" म्हणण्याची धमक शिकावी ती तुझ्याकडून. अन्‌ रात्रभर खिंडीत २०-२५ सरदारांनिशी हजारोंच्या सेनेला थोपवून धरणा-या टोळीला तांबडं फुटताच नव्या दमाची कुमक मिळावी तसे ते पावसाळी ढग येतातच की मग काही महिन्यांनी तुझ्या मदतीला! तोवर त्या सूर्याची मस्ती पूर्ण जिरलेली असते, आणि राखाडी आकाशाच्या दरबारी एकटा तूच विजेता असतोस. अमलतास, लेका तूच खरा गुरू आहेस.

धृवपद


चमचमत्या अंशुलांचा अंगरखा पांघरलेल्या त्या थेंबाने उंच आकाशातून गंगेप्रति झेप घेतली होती. काही तपांपूर्वीचा त्याचा जन्मदिवस त्याला आठवत होता...

... ग्रीष्मातील तप्त मध्याह्नीनंतर सगळे नगरजन गंगेच्या संध्याऽरतीसाठी तीरावर जमले होते. फुलांच्या विविध रंगांनी, धूपांच्या वासानी, घंटांच्या शुभसूचक नादांनी आणि दिवसभराच्या रोमहर्षक गोष्टी गंगामाईला सांगायला आलेल्या पक्ष्यांनी वाळवंट कसं संजीवित झालं होतं! यथावकाश आरती उरकली आणि सर्वांनी आपापल्या पणत्या पात्रात सोडल्या. सगळ्या गजबजाटापासून किंचित दूर एका युवकाने त्याच्या गुरुला साष्टांग नमस्कार केला आणि त्यांची पायधूळ भाळी लावली. आजचा दिवस अत्यंत पवित्र होता. आज त्या युवकाचं शिक्षण पूर्ण झालं होतं. यापुढे तो अनेक वर्ष स्वत:च्या भारदस्त गायनाने देशोदेशींच्या रसिकांना मुग्ध करणार होता. संथ वाहत चाललेल्या गंगेतील दीप्तीमान दिव्यांना डोळ्यात साठवत त्यानं षड्जाचं अधिष्ठान घातलं. निमिषार्धातंच त्याच्या नेत्रातून निखळलेल्या अश्रूच्या त्या थेंबात तिथलं सारं दृश्य उमटलं. आजूबाजूला जमू लागलेल्या गर्द काळोखात जान्हवीच्या गौरवर्णावर पणत्यांचे सुवर्णालंकार किती मोहक दिसत होते! जन्मत:च त्या थेंबाची एका सुंदर सत्याशी ओळख झाली होती, आणि इतक्या शुभमुहूर्तावर जन्मलेल्याची ध्येयपूर्ती न झाली तरंच नवल!

...मध्यंतरी कितीक वर्षे लोटली. आता वृद्धत्वाकडे झुकलेला तो युवक नावाने, मानाने खूप मोठा झाला होता. त्याने विद्येची पूजा कधीच केली नाही. त्यानं पूजलं ते स्वत:ला. देवानं जशी स्वत:च्या आनंदासाठी सृष्टी रचली, तशीच त्या युवकाने स्वत:ची स्वरांगी दुनिया बनविली. त्या थेंबाचाही प्रवास चालूच होता. कधी मातीच्या कणांतून, कधी वा-याबरोबर, कधी ढगांतून, कधी पक्ष्यांच्या रंगीत पंखांवरून. सृष्टीची इतकी अनेकविध रुपे बघूनही त्याला त्याच्या प्रियेचा अद्याप विसर पडला नव्हता...

... अन्‌ आज इतक्या वर्षांनंतर त्या तिघांची परत भेट होत होती. एक शीतल पहाट येऊ घातली होती. वा-य़ाच्या प्रत्येक झुळूकेबरोबर थेंबावर हर्षोल्हासाचे तरंग फुटत होते. अलकनंदेचाच शुभ्र रंग ल्यालेल्या त्या वाळूत आताशा थकलेल्या त्या युवकाने भैरवाचे कोमल स्वर लावले होते. सूर कोमल असले, तरी धृपद आवेशपूर्ण होतं. त्या बोलांमध्ये जरी जगन्नियंत्याच्या श्रेष्ठ तेजाची महती वर्णिलेली असली तरीही ते धृपद म्हणजे स्वत:च्या देदिप्यमान कारकिर्दीची विनम्र भावाने सांगितलेली कथा होती. वयानुसार जरी लयीत जबरदस्त संयम आलेला असला तरी ते धृपद तरुण होतं, त्याला नाविन्याची आस होती. पखावजाच्या प्रत्येक जोरकस थापेसरशी कित्येक नवजात खगांना पंख फुटत होते, अन्‌ धा दिं ता किट तक गदि गन च्या ठेक्यावर कितीक गर्द वृक्षांची नवी पालवी नाचत होती. रेखीव घाटदार वळणांच्या अलकनंदेचं हेमांगी सौंदर्य त्या थेंबात उमटत होतं. संथ गतीनं अवतीर्ण होणा-या आरक्त सूर्यकन्येला अंगाखांद्यावर खेळवणारी जान्हवी कोण मोहक दिसत होती! जाणा-या प्रत्येक क्षणामागे गंगेचे अंतरंग अधिकच खुलू लागले होते. एकाच स्पर्शासवे त्याच्या प्रियेच्या सुकुमार गालांवर उमटणा-या तरल जलतरंगांचं त्याचं स्वप्न आता केवळ दोनच क्षण लांब होतं... ... किट तक गदि गन धा.

[आधारीत: स्थितप्रज्ञ तळ्याच्या प्रेमात पडलेल्या नदीची मूळ कल्पना संपदाची]

Crazy Ideas (4)
चालीत चाल, पराग चाल – ऊर्फ ब्राऊनची चाल

आमच्या डिपार्टमेंटातल्या मास्तर आणि मास्तरीणबाईंना शिकवायला अमेरिकेहून नुकतेच एक गांगुली नावाचे प्रोफेसर आले होते. आणि झालं असं की ते भारतीय शास्त्रीय संगीताचे नुसते शौकीनच नाही तर उत्तम गायकही निघाले. त्यांच्या अल्प परिचयासकट कार्यक्रमाचं एक आमंत्रण सर्वांना गेलेलं होतच. त्यातूनच त्याचे बरेचसे गुरू मराठी असल्याचं कळलं. मनोमन खूप छान वाटलं. कार्यक्रम सुरू झाला, खड्या आवाजात त्यांनी गौरी-भैरव व सावनी-केदार पेश केला. नंतर कुठल्याश्या रागात एक विवादी कोमल गंधार त्यांनी घेतला आणि नंतर रसिकांना समजावून सांगताना म्हटले (इंग्रजीतून बरंका!) “बघा, ह्या रागाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून हा एक कोमल स्वर कसा खुबीने आला आहे ह्या बंदिशीमध्ये. ह्याला आम्ही मराठीत ‘गालबोट’ असं म्हणतो.” अर्थातच ही मराठी संज्ञा त्यांच्या गुरूजींनी त्यांना शिकविली असणार. नंतर त्यानी एक बंगाली भजन गायलं आणि हसून म्हणाले, “माझ्या आडनावाचा आदर ठेवून मी बंगाली भजन म्हटलंच पाहिजे होतं नाही का? मला बंगला येत नाही ह्यावर एकदा कोलकात्याच्या वंगबंधूनी मला धारेवर धरलं होतं!”. ह्यानंतर मात्र जे झालं त्यानं आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. ते म्हणाले की ते मुंबईत वाढले आहेत, आणि अस्खलित मराठीत त्यांनी आम्हाला कुठला अभंग गाऊ असं विचारलं. आमची फर्माईश – “माझे माहेर पंढरी” ते अतिशय ताकदीनं गायले, आणि आमचे कान तृप्त झाले. काय गंमत आहे बघा - ते वाढले मुंबईत, कर्मभूमी अमेरिका, मी वाढलो पुण्यात, प्रोफेसरांशी भेट झाली अजूनच तिसरीकडे, कानपुरला; त्यांचं आडनाव अगदी आतून बाहेरून बंगाली, पण ते होते मात्र मराठी!

बरोबर तीनशे पासष्ट दिवसांपूर्वीची अश्शीच एक भेट आठवते मला. आमच्या डिपार्टमेंटाने तर्कशास्त्रावर एक आंतरराष्ट्रीय सभा भरवली होती आणि एका रात्री त्या सभेच्या सगळ्या लोकांचं एकत्र जेवण होतं. सभेच्या नियोजनामध्ये थोडाफार हातभार लावला म्हणून आमच्या मास्तरीणबाईंनी आम्हालाही जेवणाचं आमंत्रण धाडलं होतं. आमच्या इथले सगळे शिक्षक एकदम मस्त आहेत. त्यांच्याशी मस्त गप्पा चालू होत्या. सूप्स वगैरे चा अस्वाद घेत सगळीकडे गप्पाष्टकं रंगलेली होती. योगायोगाने, त्याच वेळेस एका वेगळ्याच विषयावर व्याख्यान द्यायला पोर्तुगालहून एक संशोधक आमच्या डिपार्टमेंटात आले होते. खरंतर ते ह्या सभेशी निगडीत नव्हते, पण डिपार्टमेंटाचे अतिथी म्हणून त्यांनाही जेवणाचं निमंत्रण होतं. माझ्या एका शिक्षकांनी माझी ह्या प्रोफेसरांशी ओळख करून दिली. प्रोफेसर त्यांच्या मुलीलाही बरोबर घेऊन आले होते - तिला भारत दाखवायला. सुरेख कुरळ्या केसांच्या त्या मुलीचं नाव आरीयान्नी. साधारण आमच्याच वयाची असेल ती. आरीयान्नी ही ग्रीक पुराणांमधली एक राजकन्या. प्रोफेसरांनी आम्हाला आरीयान्नीची पुराणातली गोष्ट सांगायला सुरूवात केली. प्रोफेसरांचं इंग्रजी थोडंसं कमकुवत असल्याने ते अगदी निवांतपणे, बरोबर शब्द हुडकत, ती गोष्ट सांगत होते, पण कुठेही कंटाळवाणं होऊ देत नव्हते. जिथे जिथे तिच्या बापाचा उल्लेख येई तिथे तिथे स्वत:ची त्याच्याशी तुलना करत “मी तसा नाही बरंका” वगैरे म्हणून आम्हाला हसवत होते. तर, मध्येच त्यांना गोष्टीचा कुठलासा भाग नीटसा आठवला नाही, म्हणून त्यांनी छोकरीकडे एक मदतीसाठी कटाक्ष टाकला. आता ख-या आरीयान्नीला इंग्रजी मुळीच येत नव्हतं. आणि गोष्टीतल्या आरीयान्नीला आता रडायचं होतं. म्हणून तीने आपल्या भावपूर्ण हातवा-यांसह प्रोफेसरांना तो भाग समजावून सांगितला आणि गोष्ट पुढे सुरू झाली. नंतर थोड्याफार गप्पा झाल्या. प्रोफेसर व आरीयान्नी काही दिवसांनी वाराणसीला जाणार होते. जेमतेम पंधरा-एक मिनिटांची आमची भेट, पण मला अजूनही ती संध्याकाळ आठवली की फार भारी वाटतं. ती मुलगी कुठेतरी सहस्र मैल दूर जन्मलेली, वाढलेली आणि निव्वळ योगायोगाने जगाच्या तिस-याच कोप-यात आमची केवळ काही मिनिटं झालेली भेट! दुस-या दिवशी सकाळी मला तिचा चेहरा मुळीसुद्धा आठवेना.

खोटं वाटेल, पण अश्या वेगवेगळ्या भन्नाट लोकांशी माझ्या अवचित आणि संस्मरणीय भेटी गेलं वर्षभर होतंच आहेत. कोण, कुठे, कधी भेटेल ह्याचा नेम नाही. ह्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी यम बोलवायला आला ना, की मी एक गम्मत करायची योजली आहे. यमाकडून थोडीशी “टँप्लीज” मी मागून घेणार आहे. पृथ्वीचा एक मोठा गोल आणून मी जसा जसा जगत गेलो तश्या तश्या त्यावर रेघोट्या ओढणार आहे. मग रेघोट्या ओढता ओढता मला तेव्हा अशाच कुठे-कुठे झालेल्या अनंत भेटी आठवतील. पाण्यात पडलेल्या मट्ट्ट्ठ पराग कणाची कशी धावपळ चालू असते की नाही, तसं दिसेल माझं जीवन मग मला…

इकडून तिकडे, तिकडून भलतीकडे… मध्येच येऊन धडकणारे असेच अनेक बेअक्कल परागकण… इकडून तिकडे हळूच, तिकडून भलतीकडे वेगात... इथे “हाय”, तिथे “बाय”, परत धडक, परत “हाय”… इकडून तिकडे, तिकडून आणिक भलतीकडे... बेअक्कल, बेअक्कल… मस्तंच!