किती गणितं सोडवतोस दिवसाला?

"ऐला! म्हणजे तुम्हाला परिक्षेत फक्त गणितं सोडवायची असतात?" दुपारी २ च्या अत्यंत शुभसूचक वेळी अमृताचा (निळी टोपी वाले ह्याला "चहा" म्हणतात) चषक हाती असताना, एका बेसावध क्षणी, एकीने मला फुलटॉस वर क्लीन बोल्ड केला. लोकहो, थांबा. हा प्रश्न वरवर जितका हास्यास्पद दिसतो, तितका बावळट मुळीच नाही. ह्याच्या मुळाशी गणित ह्या विषयाबद्दल समाजात असलेलं अज्ञान दडलेलं आहे. पोरगं गणितात PhD करतंय म्हटल्यावर लोक अक्षरश: चेकाळतात, आणि असे काही प्रश्न विचारतात, की विचारता सोय नाही! यंदाच्या सुट्टीत तर लोकांनी कहर केला. "काय मग, किती गणितं सोडवतोस दिवसाला?" अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला असलेली एक कन्या. "अख्खी पी. एच. डी भर तुम्हाला एकच गणित असतं का रे? शी किती बोअर!". "वा वा... म्हणजे कानडे’ज्‌ थियरम येणार आता पाचवी च्या पुस्तकात!" ही त्यातलीच काही सालस वाक्य. दुकानात गेलं, की "अरे हा ठेवील की हिशेब, गणितात आहे लेकाचा". भले! गेले पाच वर्ष मी एकही "मोठी बेरीज-वजाबाकी-गुणाकार-भागाकार" केलेली नाही ह्यावर विश्वासच बसत नाही लोकांचा. जरा शिकले सवरलेले, (विशेषत: JEE वगैरे साठी "Prepare" करणारे) तर अज्जूनही मला टॅनॉफ्कॉटॉफेक्स चं integral करून देतोस का वगैरे विचारतात. "तुझा फेवरेट नंबर कुठला रे?" ह्या ही प्रश्नाला मी सामोरा गेलोय. अहो हे तर काहीच नाहीये. "तुला हे सगळे थियरम्स खरे वाटतात का रे? मला की नै फक्त १०वी पर्यंतचेच खरे वाटतात बाई." आता बोला. है कोई जवाब? पण उपरोक्त सर्व जनता ही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात सरस असल्याने मी हे सगळं हसण्यावारी नेलं. मात्र एकदा मुंबई हून लखनऊ ला जाताना, आमच्या समोर बसलं होतं एक पात्र. ३० वर्षांचा घोडा झाला तरी साईड-अप्पर ही सामान ठेवण्याची जागा नसून झोपायची जागा आहे ह्याचं त्याला ज्ञान नसावं. (कारण त्याने तसं आम्हाला विचारलं देखील!) कोण कुठला करता करता मी त्याला सांगितलं गणित शिकतोय म्हणून. तर म्हणे बारावीला Integration होतं का तुम्हाला? म्हटलं हो. तर म्हणे, "मग आता काय राहिलय शिकायचं गणितात?" मी बदाबद तोंडाला येतील ते शब्द टाकले, मग चूप बसला.

तर अशी सगळी मजा. गणिताचं एक सोडा. पण कुठल्याही विषयात PhD करणं हाच एक खूप मोठा संशोधनाचा विषय ठरावा. आत्ता आमच्या पदवीदान समारंभाच्या वेळी एका केमिस्ट्री वाल्या बाबाने १३ शब्दी नावाच्या कंपाऊंड वर PhD केल्याचं आम्हास आढळलं. PhD वाल्या लोकांमध्ये ह्या महाभागाला सर्वाधिक टाळ्या पडल्या! त्याने पहिला महिना फक्त ते नाव पाठ करण्यात घालवला अशीही वदंता होती. लोक कशावरही PhD करतात. २००३-०४ मध्ये "सामना" मध्ये जे दैनिक राशीभविष्य यायचं[१] त्यानंतर सगळ्यात विनोदी म्हणजे सकाळ मध्ये येणारं "पी. एच. डी. चे मानकरी" हे सदर होय. प्रबंधाचं शीर्षक ४ ओळींपेक्षा कमी असेल तर देतच नाहीत वाटतं PhD. विषय पण महान. "हवाई बेटांवरील साहित्यावर हिंदू संस्कृतीचा प्रभाव" वर गडचिरोली विद्यापीठातून हवाई बेटांवर पाऊलही न ठेवता PhD.[२] आऽवराऽ! पण ज्यूरीतील सभ्य गृहस्थहो, विषय काहीही असला, तरी PhD ही PhD असते. तुमच्यासारख्या पैशाच्या मागे पिसाट सुटलेल्या भोगवादी, चंगळवादी संस्कृतीला नाही समजायचं ते.[३]

तर मुद्दा असा, की ५ वर्ष डोकेफोड करूनही हाती काय लागेल ह्याची शाश्चती नाही.म्हणून आम्ही आधीच "PhD जमली नाही तर काय?" ह्या प्रश्नाचा विचार करायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्र बोर्डाची सद्य:स्थिती बघता ५ वर्षांनी आम्ही प्रस्तुत लेखात निर्दीष्ट एकमेव कल्पनाचित्राप्रमाणे "गणिते सोडवून देण्याचा" धंदा सुरू करण्याच्या इराद्यात आहोत. तरीपण ४-५ (खडतर) वर्षांनंतर असा कुठला फलक शनिवार-सदाशिव मध्ये आढळला तर चमकू नका. आणि हो... एक राहीलंच. त्यावेळी ह्या लेखाचं कात्रण घेऊन येणारास खरे एक आणि जीवनाचे एक अशी दोन गणिते मोफत सोडवून देवू!
---
[१]. "आज पडदे बदलावेसे वाटतील." अरे?!
कळस - "आज कान कोरू नका." अहो, हे तर भविष्यही नाहीये!!!
[२]. नावं खरोखरंच बदलली आहेत.
[३]. इथे येऊन बघा. फुकट खाणं दिसलं की "Grad Students" कसे फॅमिली सकट येऊन बसतात ते. [४]
[४]. PhD करताना तळटीपा लिहीण्याचा सराव हवा म्हणे. म्हणून हा खटाटोप.