हातात हात

हातात हात

[आज खूप लिहायचंय. आज खूप बोलायचंय. आणि आजच साले शब्द हरवलेत.]

पहाट झाली. डोळे किलकिले करून बघितले तर सगळा प्रदेशच नवा. कुठली तरी भैताड वेळ, कुठली तरी भैताड जागा. खूप वर्षांपूर्वी आमचा वाडा होता. अगदी पुण्याच्या हृदयात. घरात चिकार माणसं होती. आजी, आजोबा, चुलत आजी, चुलत आजोबा, आत्या, आमची सगळी मांजरं, एक छोटंसं कासव सुद्धा! वाडा पण झकास होता अगदी. एकदम गोष्टीतल्या सारखा. मोठ्ठं अंगण होतं, आंबा, फणस, रातराणी ची झाडं होती, आणि संडास ला जायचा एक जाम भीतीदायक रस्ता पण होता. अशा वाड्यात आमची कधीतरी मस्त मैफल जमायची. सगळे आजी आजोबा, आत्या, आई, बाबा, मी असे दुपारचं जेवण उरकून अंगणात पत्ते खेळायला बसायचो. जेवणाचा बेत पण कसा? आबांच्या हातच्या फुफाट्यात भाजलेल्या वांग्याचं भरीत मला अज्जून आठवतं. पत्ते खेळतांना मला नेहमी लहान म्हणून फक्त पत्ते टाकायचं काम मिळायचं. तेव्हा मला फार राग यायचा. ३०४ खेळतांना भंगार डाव आला की आबा नेहमी चिटींग करून सगळे पत्ते उपडे करून डाव "ओम्‌ फस्‌" करायचे. उगच चिडी खेळण्यात तर आमच्या घरचे पटाईत! कोण जिंकायचं कोण हरायचं वगैरे मला आता काही आठवत नाही. ह्या सगळ्या गोष्टींना चिकार वर्षं झाली. मध्यंतरी देव म्हटला, मला पण तुमच्यात खेळायला घ्या, आणि त्याने आमच्यातले बरेच हात ओढून घेतले. आता तो वाडाही गेला, संध्याकाळी अंगणात बसून स्वत:च्या हाताने गरम गरम वरण-भात भरवणारी आजीही गेली. माझ्यासाठी रोज न चुकता चिंच गुळाची आमटी करणारी चुलत आजीही गेली.

कधीतरी चांदण्या रात्री लाईट गेले की आईच्या मांडीवर डोकं ठेवून अंगणात रेडीयोवर गाणी ऐकायला किती अवीट मजा यायची! अगदी परवाच आई म्हणाली - खूप पैसे कमवून एखादा सुंदर वाडा विकत घेईन असा का नाही रे म्हणत तुम्ही?

हातात हात...

****

परवा राहुल ने पिंग केलं आणि म्हटला: "तुला सांगितलं का रे मी?" त्याला तिथल्या तिथे थांबवून म्हटलं - मित्रा, ह्यापुढे कधी चुकून सुध्दा वाक्याची सुरुवात अशी करू नकोस. हल्ली असल्या सगळ्या वाक्यांचा शेवट "माझं लग्न ठरलंय" ने होतो.

श्रावणातल्या दर रविवारी कशी आदित्य-राणूबाईची तीच तीच कहाणी परत परत सांगायची असते ना, तशीच एक ओरिजनल [उच्चारी "व्हर्जिनल"] कहाणी आमच्या कडे पण आहे. ह्या कहाणीची अगदी मागच्याच महिन्यात पुन:प्रचिती आली. जमलेल्या शंभर तरूणींमधली नेमकी आपल्याला मनापासून आवडलेलीच कशी काय "कमिटेड" निघते? एका उत्तराची कहाणी उलट सतराशे साठ प्रश्न घेऊन नेहमीच कशी निष्फळ आणि अपूर्ण राहते?

हातात हात, पिवळे हात...

*****

कोवळ्या थंडीत, चहाचा गरम्म कप दोन्ही हातात घट्ट धरून मारलेल्या गप्पा, "स्वीकार"ला "और एक कप" करत घालवलेल्या संध्याकाळी आता माझ्या आयुष्यात अजरामर झाल्या आहेत. पहाटे ११ वाजता मक्याला उठवलं की निमूट पणे डोळे चोळत MT ला चहा प्यायला यायचा. अन्‌ मग "दो इस्पेसल" ची ऑर्डर देऊन पुढचे दोन तास जगातल्या यच्चयावत गोष्टींवर चर्चा व्हायच्या. त्यात अगदी अश्लीलतम विनोदांपासून महाडोकेबाज कोट्यांपर्यंत सर्व वाङ्‌मय प्रकारांचा समावेश असायचा. एकदा मक्या म्हटला चहा जरा बोअर झालाय, आज उसाचा रस पिऊ. उसाचा रस सांगितला, तर २ मिनिटांत तयार झाला आणि पुढच्या १ मिनिटात पोटातही गेला. काय मजाच नाय. चहा सांगितला की तो यायलाच कसा अर्धा तास लागायचा. कारण "इस्पेसल" पिणारे फक्त आम्हीच. मग "राजकुमार"ला आमच्या साठी वेगळं आधण टाकायला लागायचं. मग कधीतरी तो चहा उगवणार, आणि मग शेवटी तो चहा आम्ही पिणार. तो एक लहानपणी प्रमोद नवलकरांचा धडा होता. "घंटा" नावाचा. त्यात त्यांना प्रश्न पडला होता की घंटा हा आपल्या जीवनाचा इतका अविभाज्य घटक असूनही अजून कोणी घंटेवर महाकाव्य कसं काय नाही लिहीलं? प्रमोदराव, पैजेवर सांगतो, घंटेआधी चहावर महाकाव्यं लिहीली जातील. कृष्णाने सुध्दा अर्जुनाला गीता सांगायच्या आधी सुमडीत "दो इस्पेसल" ची ऑर्डर दिली असणार, आणि मग निवांत पणे दोन हातात चहा चा गरम्म कप घट्ट धरून गीता-बिता सांगितली असणार. नक्कीच.

आता मात्र ते मैत्रीचे हातही कुठेतरी दूर राहिले...

*****

यमन रागातलं एक खूप गोड गाणं ऐकत बसलोय. आज खूपच थंडी आहे. त्यात पुन्हा पाऊस. बर्फही पडायचा कदाचित. काय सुरेख पेशकश आहे, दर कडव्यात षड्‌जाचं मृगजळ दाखवत गायिका कशी सगळ्या जगभर फिरवून आणतेय! आणि अगदी रहावेनसं झालं, की प्रत्येक कडव्याच्या शेवटी एक दीर्घ षड्‌ज येतोय...
हाताशी हात जोडून पुढच्या षड्‌जाची अत्यंत आतुरतेने वाट पहात हातांवरच्या चिरस्थायी रेषांचं कोडं सोडवत बसलोय.

हा यमन आहे. मारवा नाही. तो षड्‌ज येणारच.

17 comments:

Anup Dhere said...

कृष्णाने सुध्दा अर्जुनाला गीता सांगायच्या आधी सुमडीत "दो इस्पेसल" ची ऑर्डर दिली असणार, आणि मग निवांत पणे दोन हातात चहा चा गरम्म कप घट्ट धरून गीता-बिता सांगितली असणार. नक्कीच......
Awssome !!!

Bipin said...

are faar mhaNaje faar bhaari. kiti goshTinna daad deu!

"आणि संडास ला जायचा एक जाम भीतीदायक रस्ता पण होता"

"मध्यंतरी देव म्हटला, मला पण तुमच्यात खेळायला घ्या, आणि त्याने आमच्यातले बरेच हात ओढून घेतले" !!

"एका उत्तराची कहाणी उलट सतराशे साठ प्रश्न घेऊन नेहमीच कशी निष्फळ आणि अपूर्ण राहते?"

"घंटेआधी चहावर महाकाव्यं लिहीली जातील"

faarch surekh!

Swanand said...

zakaas..!!! khuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuupach chhaan..!!!

Shashank Kanade said...

dhanyawaad dost lok!
tumchi khoop aaThavaN yete aahe

Nachiket said...

Al Shank, bhaari ... !

Mihir Khadilkar said...

खरंच सुरेख !

Vedang said...

क्या बात है! मस्त लिहिले आहेस रे!

Mandar Gadre said...

दंडवत बाबा, दंडवत.
जियो!

Saee said...

Very honest and very beautiful. :)
Jiyo!! :)

trupti said...

baap re... surekh ch mhanawe ...!
A pan toch chaha mi suhha pyayche.. mala nai itake kai suchat baba..! pan tu chalu de, khup khup chan watate ase sagale wachun.. bless yu n mis yu...

Gayatri said...

डोळ्यांत पाणी आणतोस पोरा. सगळी शब्दचित्रं ..आणि ते शेवटचं मनातलं चित्र..खूप खूप आवडलं.

prasadb said...

अरे शंक्या!
किती सुंदर लिहीले आहेस. खूप एकदम खूप मोठा झाल्यासारखा वाटलास. (हा टोमणा नव्हता)
पण खूपच आवडलं. परत परत वाचत राहवं आणि दरवेळेला वाचताना कुठेतरी मनाला चटका लागून जावं असं.

Sushant said...

मेलेल्या माणसाला हे वाचून दाखवलं तर जगण्याच्या उमेदेनं जिवंत व्हायचा तो!!
तू ठार वेडा झालायसं...!

Nikhil said...

शंक्या, खोल कुठे तरी हृदयात हात घातलास. खरच, आठवणींचं ओझं आता पेलावत नाही. कालपरवाच जगालेले हे क्षण डोळ्यांसमोरून जातात ना जातात तोच ओल्यातून पुसट दिसणारा office मधला computer जीव खायला उठतो.

Amruta Gandhe said...

खूपच सुंदर लिहिला आहेस शशांक!
खूप बारीक details लिहिली आहेस ..simply amazing!

Deep said...

लै लै भारी लिहिलयस :) अ‍ॅडलय तुला रीडरमध्ये आता निवांत वाचेन..

yogeshkumkar said...

very nice. enjoyable again!