Crazy Ideas (4)
चालीत चाल, पराग चाल – ऊर्फ ब्राऊनची चाल

आमच्या डिपार्टमेंटातल्या मास्तर आणि मास्तरीणबाईंना शिकवायला अमेरिकेहून नुकतेच एक गांगुली नावाचे प्रोफेसर आले होते. आणि झालं असं की ते भारतीय शास्त्रीय संगीताचे नुसते शौकीनच नाही तर उत्तम गायकही निघाले. त्यांच्या अल्प परिचयासकट कार्यक्रमाचं एक आमंत्रण सर्वांना गेलेलं होतच. त्यातूनच त्याचे बरेचसे गुरू मराठी असल्याचं कळलं. मनोमन खूप छान वाटलं. कार्यक्रम सुरू झाला, खड्या आवाजात त्यांनी गौरी-भैरव व सावनी-केदार पेश केला. नंतर कुठल्याश्या रागात एक विवादी कोमल गंधार त्यांनी घेतला आणि नंतर रसिकांना समजावून सांगताना म्हटले (इंग्रजीतून बरंका!) “बघा, ह्या रागाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून हा एक कोमल स्वर कसा खुबीने आला आहे ह्या बंदिशीमध्ये. ह्याला आम्ही मराठीत ‘गालबोट’ असं म्हणतो.” अर्थातच ही मराठी संज्ञा त्यांच्या गुरूजींनी त्यांना शिकविली असणार. नंतर त्यानी एक बंगाली भजन गायलं आणि हसून म्हणाले, “माझ्या आडनावाचा आदर ठेवून मी बंगाली भजन म्हटलंच पाहिजे होतं नाही का? मला बंगला येत नाही ह्यावर एकदा कोलकात्याच्या वंगबंधूनी मला धारेवर धरलं होतं!”. ह्यानंतर मात्र जे झालं त्यानं आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. ते म्हणाले की ते मुंबईत वाढले आहेत, आणि अस्खलित मराठीत त्यांनी आम्हाला कुठला अभंग गाऊ असं विचारलं. आमची फर्माईश – “माझे माहेर पंढरी” ते अतिशय ताकदीनं गायले, आणि आमचे कान तृप्त झाले. काय गंमत आहे बघा - ते वाढले मुंबईत, कर्मभूमी अमेरिका, मी वाढलो पुण्यात, प्रोफेसरांशी भेट झाली अजूनच तिसरीकडे, कानपुरला; त्यांचं आडनाव अगदी आतून बाहेरून बंगाली, पण ते होते मात्र मराठी!

बरोबर तीनशे पासष्ट दिवसांपूर्वीची अश्शीच एक भेट आठवते मला. आमच्या डिपार्टमेंटाने तर्कशास्त्रावर एक आंतरराष्ट्रीय सभा भरवली होती आणि एका रात्री त्या सभेच्या सगळ्या लोकांचं एकत्र जेवण होतं. सभेच्या नियोजनामध्ये थोडाफार हातभार लावला म्हणून आमच्या मास्तरीणबाईंनी आम्हालाही जेवणाचं आमंत्रण धाडलं होतं. आमच्या इथले सगळे शिक्षक एकदम मस्त आहेत. त्यांच्याशी मस्त गप्पा चालू होत्या. सूप्स वगैरे चा अस्वाद घेत सगळीकडे गप्पाष्टकं रंगलेली होती. योगायोगाने, त्याच वेळेस एका वेगळ्याच विषयावर व्याख्यान द्यायला पोर्तुगालहून एक संशोधक आमच्या डिपार्टमेंटात आले होते. खरंतर ते ह्या सभेशी निगडीत नव्हते, पण डिपार्टमेंटाचे अतिथी म्हणून त्यांनाही जेवणाचं निमंत्रण होतं. माझ्या एका शिक्षकांनी माझी ह्या प्रोफेसरांशी ओळख करून दिली. प्रोफेसर त्यांच्या मुलीलाही बरोबर घेऊन आले होते - तिला भारत दाखवायला. सुरेख कुरळ्या केसांच्या त्या मुलीचं नाव आरीयान्नी. साधारण आमच्याच वयाची असेल ती. आरीयान्नी ही ग्रीक पुराणांमधली एक राजकन्या. प्रोफेसरांनी आम्हाला आरीयान्नीची पुराणातली गोष्ट सांगायला सुरूवात केली. प्रोफेसरांचं इंग्रजी थोडंसं कमकुवत असल्याने ते अगदी निवांतपणे, बरोबर शब्द हुडकत, ती गोष्ट सांगत होते, पण कुठेही कंटाळवाणं होऊ देत नव्हते. जिथे जिथे तिच्या बापाचा उल्लेख येई तिथे तिथे स्वत:ची त्याच्याशी तुलना करत “मी तसा नाही बरंका” वगैरे म्हणून आम्हाला हसवत होते. तर, मध्येच त्यांना गोष्टीचा कुठलासा भाग नीटसा आठवला नाही, म्हणून त्यांनी छोकरीकडे एक मदतीसाठी कटाक्ष टाकला. आता ख-या आरीयान्नीला इंग्रजी मुळीच येत नव्हतं. आणि गोष्टीतल्या आरीयान्नीला आता रडायचं होतं. म्हणून तीने आपल्या भावपूर्ण हातवा-यांसह प्रोफेसरांना तो भाग समजावून सांगितला आणि गोष्ट पुढे सुरू झाली. नंतर थोड्याफार गप्पा झाल्या. प्रोफेसर व आरीयान्नी काही दिवसांनी वाराणसीला जाणार होते. जेमतेम पंधरा-एक मिनिटांची आमची भेट, पण मला अजूनही ती संध्याकाळ आठवली की फार भारी वाटतं. ती मुलगी कुठेतरी सहस्र मैल दूर जन्मलेली, वाढलेली आणि निव्वळ योगायोगाने जगाच्या तिस-याच कोप-यात आमची केवळ काही मिनिटं झालेली भेट! दुस-या दिवशी सकाळी मला तिचा चेहरा मुळीसुद्धा आठवेना.

खोटं वाटेल, पण अश्या वेगवेगळ्या भन्नाट लोकांशी माझ्या अवचित आणि संस्मरणीय भेटी गेलं वर्षभर होतंच आहेत. कोण, कुठे, कधी भेटेल ह्याचा नेम नाही. ह्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी यम बोलवायला आला ना, की मी एक गम्मत करायची योजली आहे. यमाकडून थोडीशी “टँप्लीज” मी मागून घेणार आहे. पृथ्वीचा एक मोठा गोल आणून मी जसा जसा जगत गेलो तश्या तश्या त्यावर रेघोट्या ओढणार आहे. मग रेघोट्या ओढता ओढता मला तेव्हा अशाच कुठे-कुठे झालेल्या अनंत भेटी आठवतील. पाण्यात पडलेल्या मट्ट्ट्ठ पराग कणाची कशी धावपळ चालू असते की नाही, तसं दिसेल माझं जीवन मग मला…

इकडून तिकडे, तिकडून भलतीकडे… मध्येच येऊन धडकणारे असेच अनेक बेअक्कल परागकण… इकडून तिकडे हळूच, तिकडून भलतीकडे वेगात... इथे “हाय”, तिथे “बाय”, परत धडक, परत “हाय”… इकडून तिकडे, तिकडून आणिक भलतीकडे... बेअक्कल, बेअक्कल… मस्तंच!