धृवपद


चमचमत्या अंशुलांचा अंगरखा पांघरलेल्या त्या थेंबाने उंच आकाशातून गंगेप्रति झेप घेतली होती. काही तपांपूर्वीचा त्याचा जन्मदिवस त्याला आठवत होता...

... ग्रीष्मातील तप्त मध्याह्नीनंतर सगळे नगरजन गंगेच्या संध्याऽरतीसाठी तीरावर जमले होते. फुलांच्या विविध रंगांनी, धूपांच्या वासानी, घंटांच्या शुभसूचक नादांनी आणि दिवसभराच्या रोमहर्षक गोष्टी गंगामाईला सांगायला आलेल्या पक्ष्यांनी वाळवंट कसं संजीवित झालं होतं! यथावकाश आरती उरकली आणि सर्वांनी आपापल्या पणत्या पात्रात सोडल्या. सगळ्या गजबजाटापासून किंचित दूर एका युवकाने त्याच्या गुरुला साष्टांग नमस्कार केला आणि त्यांची पायधूळ भाळी लावली. आजचा दिवस अत्यंत पवित्र होता. आज त्या युवकाचं शिक्षण पूर्ण झालं होतं. यापुढे तो अनेक वर्ष स्वत:च्या भारदस्त गायनाने देशोदेशींच्या रसिकांना मुग्ध करणार होता. संथ वाहत चाललेल्या गंगेतील दीप्तीमान दिव्यांना डोळ्यात साठवत त्यानं षड्जाचं अधिष्ठान घातलं. निमिषार्धातंच त्याच्या नेत्रातून निखळलेल्या अश्रूच्या त्या थेंबात तिथलं सारं दृश्य उमटलं. आजूबाजूला जमू लागलेल्या गर्द काळोखात जान्हवीच्या गौरवर्णावर पणत्यांचे सुवर्णालंकार किती मोहक दिसत होते! जन्मत:च त्या थेंबाची एका सुंदर सत्याशी ओळख झाली होती, आणि इतक्या शुभमुहूर्तावर जन्मलेल्याची ध्येयपूर्ती न झाली तरंच नवल!

...मध्यंतरी कितीक वर्षे लोटली. आता वृद्धत्वाकडे झुकलेला तो युवक नावाने, मानाने खूप मोठा झाला होता. त्याने विद्येची पूजा कधीच केली नाही. त्यानं पूजलं ते स्वत:ला. देवानं जशी स्वत:च्या आनंदासाठी सृष्टी रचली, तशीच त्या युवकाने स्वत:ची स्वरांगी दुनिया बनविली. त्या थेंबाचाही प्रवास चालूच होता. कधी मातीच्या कणांतून, कधी वा-याबरोबर, कधी ढगांतून, कधी पक्ष्यांच्या रंगीत पंखांवरून. सृष्टीची इतकी अनेकविध रुपे बघूनही त्याला त्याच्या प्रियेचा अद्याप विसर पडला नव्हता...

... अन्‌ आज इतक्या वर्षांनंतर त्या तिघांची परत भेट होत होती. एक शीतल पहाट येऊ घातली होती. वा-य़ाच्या प्रत्येक झुळूकेबरोबर थेंबावर हर्षोल्हासाचे तरंग फुटत होते. अलकनंदेचाच शुभ्र रंग ल्यालेल्या त्या वाळूत आताशा थकलेल्या त्या युवकाने भैरवाचे कोमल स्वर लावले होते. सूर कोमल असले, तरी धृपद आवेशपूर्ण होतं. त्या बोलांमध्ये जरी जगन्नियंत्याच्या श्रेष्ठ तेजाची महती वर्णिलेली असली तरीही ते धृपद म्हणजे स्वत:च्या देदिप्यमान कारकिर्दीची विनम्र भावाने सांगितलेली कथा होती. वयानुसार जरी लयीत जबरदस्त संयम आलेला असला तरी ते धृपद तरुण होतं, त्याला नाविन्याची आस होती. पखावजाच्या प्रत्येक जोरकस थापेसरशी कित्येक नवजात खगांना पंख फुटत होते, अन्‌ धा दिं ता किट तक गदि गन च्या ठेक्यावर कितीक गर्द वृक्षांची नवी पालवी नाचत होती. रेखीव घाटदार वळणांच्या अलकनंदेचं हेमांगी सौंदर्य त्या थेंबात उमटत होतं. संथ गतीनं अवतीर्ण होणा-या आरक्त सूर्यकन्येला अंगाखांद्यावर खेळवणारी जान्हवी कोण मोहक दिसत होती! जाणा-या प्रत्येक क्षणामागे गंगेचे अंतरंग अधिकच खुलू लागले होते. एकाच स्पर्शासवे त्याच्या प्रियेच्या सुकुमार गालांवर उमटणा-या तरल जलतरंगांचं त्याचं स्वप्न आता केवळ दोनच क्षण लांब होतं... ... किट तक गदि गन धा.

[आधारीत: स्थितप्रज्ञ तळ्याच्या प्रेमात पडलेल्या नदीची मूळ कल्पना संपदाची]