अरे हाड!

खो-खो हा खेळ मोठाच मस्तान. बघायला अत्यंत रोमांचक आणि खेळायला तितकाच अवघड. झनाट वेगाने सुरू असलेला अटॅक, चतुराईने दिलेल्या झुकांड्या, निडरपणे दोन दोन पाट्या मारलेल्या दिलखेचक डाईव्ज, हुशारीने पोल वर खेचलेले गडी, सटासट मारलेले पोल, सुसाट केलेले रश, तर कधी संथ गतीने बचाव करून "पाडलेला" अटॅक, बाहेरून जोशात केलेलं चियरींग, गडी मारल्यावर माजात केलेलं अपील, शड्डू ठोकून दिलेल्या खुनशी आणि अश्याच रोमांच आणणा-या कितीतरी गोष्टी.

खो-खो चं नाव जरी काढलं तरी माझ्या मनात कितीतरी आठवणी जाग्या होतात. डाईव्ह टाकली की माझ्या कमरेला उजवीकडे नेहमी जखम व्हायची. असंच खूप दिवस होऊन होऊन ती जखम जाम चिडकी झाली होती. जखम भरायच्या आतच परत फुटायची. त्या दिवशी अशीच प्रॅक्टीस चालू होती. आमचा आधी अटॅक होता. आमच्या टीमच्या फर्स्ट बॅचचा गडी बॅटींग करत होता. (क्रिकेट मधे बॅटींग = बचाव, हीच संज्ञा खो-खो मध्ये जशीच्या तशी उचललेली आहे.) आणि उरलेले आम्ही सगळे अटॅकला होतो. चतुरपणे त्याने आमचा पूर्ण अटॅक झोपवला होता. २ मिनिटं झाली, ३ झाली, आऊटच होईना. पोल मारावा तर हात भर लांबून पोल सोडायचा, अक्शन खो बरोबर स्पॉट करायचा. ४ मिनिटं झाली तरी कोणाच्या हातीच येईना. साधारणपणे पळणारा दमला की तो ट्रॅक वर पळणं सोडून चारच ऍटॅकर्सना घेऊन खेळतो, जेणेकरून दम-श्वास परत मिळवता येतो. आता त्याने असं चौघातलं खेळायला सुरूवात केली. जखमेमुळे मी आधीपासूनच डाईव्ह मारायला कचरत होतो. पण आता अती झालं. दैवयोगाने एकदा त्याने मला चौघात घेतलं. माझं चार पावलं "कव्हर" झाल्यावर त्यानं झटकन झुकांडी दिली अन्‌ तो आत गेला. तो अगदी जस्ट माझ्या टप्प्यात होता. मागून "शंक्या उड" असं कोणीतरी म्हणायच्या आतंच माझं रक्त कमरेच्या जखमेतून मेंदूत चढलं होतं, दिसत होते ते पळणा-याचे खांदे, अन्‌ कुठलाही विचार न करता पुढच्याच क्षणाला मी हवेत दोन फूट जमिनीला समांतर उडालेलो होतो. खेचलेले हात पळणा-याचा कमरेला लागले, मी जमिनीवर पडलो. मागून "मारलाय, मारलाय" च्या आरोळ्या उठत होत्या. शिट्टी वाजली.

जखमेवरचा कापूस निघून परत एकदा कंबर रक्ताळली होती. एकवार झोंबणा-या जखमेकडे बघून आपसूकच उद्गार निघाले: "अरे हाड!".

*****

You Can Win.

Monk Who Sold His Ferrari.

Self - Help books.

२१ अपेक्षित.

यशाची गुरुकिल्ली.

अरे हाड!

*****

हळूहळू उन्हाळा सुरू होत होता. गरम्म्म दुपारी, गरम्म्म वा-यात, गरम्म्म उन्हात जीव हैराण होवून जाई. ज्या बातम्यांसाठी कान तरसले होते, त्या तर दूरच राहिल्या, पण जे नको तेच भाग्यात येत होतं. अशा अवघड वेळी मला आधार दिला तो अमलतासाच्या सोन-बहराने लवडलेल्या झाडांनी. माजुरड्या उन्हाच्या थोबाडावर थुंकून त्याच्यापेक्षाही सरस रंगात रंगणा-या अमलतासाला मानला आपण. इतक्या उकाड्यातही भान हरपावं असा त्याचा पिवळा धोम रंग. पण अमलतास अन्‌ गुलमोहराची बातच और. रोज संध्याकाळी शेवटी कंटाळून सूर्य घरी धूम ठोकत असे, उद्या परत येईन तुझी जिरवायला म्हणून. अमलतास, लेका तू खरा तरूण आहेस. अरे कसल्या अडचणी आणि कसली संकटं रे? एकदा सणसणीत "अरे हाड" म्हणण्याची धमक शिकावी ती तुझ्याकडून. अन्‌ रात्रभर खिंडीत २०-२५ सरदारांनिशी हजारोंच्या सेनेला थोपवून धरणा-या टोळीला तांबडं फुटताच नव्या दमाची कुमक मिळावी तसे ते पावसाळी ढग येतातच की मग काही महिन्यांनी तुझ्या मदतीला! तोवर त्या सूर्याची मस्ती पूर्ण जिरलेली असते, आणि राखाडी आकाशाच्या दरबारी एकटा तूच विजेता असतोस. अमलतास, लेका तूच खरा गुरू आहेस.