On the road (१)

सकाळी ६ वाजता, यांत्रिकपणे कॉफी पिणार्‍यांच्या घोळक्यात, नटी एकटीच हातवारे करत फिरत होती. नटी किंचीत येडी होती यात शंकाच नाही. येणार्‍या जाणार्‍यांना तावातावाने प्रश्न विचारत होती. कधी कधी उसनं अवसान आणून खोटं खोटं हसत होती. कॉफी च्या दुकानात सर्वांसमोर कसलं तरी गार्‍हाणं मांडत होती. कधी पुटपुटत तर कधी आवेशात, कधी खोटं खोटंच हसत होती, कधी खरंच रडत होती. सकाळी ६ वाजता, यांत्रिकपणे कॉफी पिणार्‍यांपैकी एकालाही नटीशी काहीही घेणं देणं नव्हतं. तरीही ती त्या अवाढव्य मंचावर मुक्तपणे फिरत होती. एकदा नजरा-नजर झाली तेव्हा, "नामास्ते, इंडियन!" म्हणाली. किंचीत येडी होती यात शंका नाही,  पण किती ते सांगणं अवघड आहे.

-----

बोचरा वारा आणि वर वांझोटा सूर्यप्रकाश. २० मैल सायकल वरून रपेटल्यावर निवांत तळ्याकाठी फोटो काढत विसावलो होतो. "काय! झालं का वार्‍याला फोटोत पकडून?", येवढ्या कडक वार्‍यातही शर्ट सत्ताड उघडा ठेवलेला एक बाबा उभा होता. त्याचं नाव उलाव्ह. बोलायला सुरुवात झाली. बर्‍याच वेळी असले बाबे शेवटी "दादा, घरी जायला पैसे नाहीत, एखाद डॉलर देता का" वगैरे विचारते होतात, पण ह्या माणसाचे डोळे मिश्कील होते. त्यामुळे तो एखादा धर्मोपदेशेक असण्याचीही शक्यताही कमीच होती. [असलेही बाबे खूप दिसतात. बाबे हे "बाबा" चे अनेकवचन आहे.] एकातून एक विषय निघत गेले. गप्पा रंगल्या. विश्चाच्या "बाहेर" काय असतं? नसणं म्हणजे काय? आईनष्टाईन चा सापेक्षतावाद वगैरे पर्यंत गाडी गेली. [ज्याबद्दल मला अगदीच नगण्य माहिती होती. असो.] ह्या बाबाला बोलण्याचं येड होतं. उलाव्ह नॉर्वेत वाढला. "आमच्या इथे सदा सर्वदा असाच वारा", उलाव्ह म्हणाला. त्यांचं घर अगदी समुद्राकाठी होतं. आणि वारा येवढा, की वार्‍याने उडवून नेलेल्या कोंबड्यांच्या संख्येवरून त्याची ताकद मोजायची. बरेचसे केस पांढरे झालेल्या उलाव्ह च्या उघड्या छातीचं रहस्य आता उकललं. उलाव्ह ला तो थोडासा सूर्यप्रकाशही पुरेसा होता. "अश्यावेळी की नाही, खूप उंच गवतात जाऊन झोपायचं. खूप मऊ पण वाटतं, वार्‍याचा त्रास देखील होत नाही, आणि वरून छान प्रकाशही मिळतो". उलाव्ह एक क्षण थांबला. "मित्रा, असे आनंद स्वत:च शोधायचे. अश्या छोट्या छोट्या गमती दुसरं कोणीही तुला सांगायला येणार नाही!" उलाव्ह चा स्वरात किती आर्जव भरलं होतं!

"पोरा, वय काय तुझं? तुला अजून जीवनात खूप अनुभव घ्यायचे आहेत. चांगले, वाईट, सगळेच. आणि आज इथे जर जुना उलाव्ह असता तर तो असं मुळीच कोणाशीही जाऊन बोलला नसता. हे वेड वयाबरोबर येतं बघ."
सायकलच्या चक्क हॅंडलवरच उलटं बसून पॅडल मारत मारत उलाव्ह ने आमचा निरोप घेतला. पांढर्‍या केसांच्या, मिश्किल डोळ्यांच्या, जराश्या बुटक्या, येवढ्या वार्‍यातही छाती सत्ताड उघडी ठेवणार्‍या आणि पेशाने स्थापत्य-शास्त्रज्ञ असलेल्या उलाव्ह ने बोलण्याचं वेड काय सुरेख आत्मसात केलं होतं!

-----

विविध लोकांची ओळख करवण्यासाठीच दिवसाचा उत्तरार्ध जन्मला आहे.

नुकतीच संध्याकाळ येऊ घातली होती. मी आणि माझा मित्र एका टपरीवर ऑर्डर ची वाट बघत उभे होतो. समोर एक भिकारी इकडेतिकडे फिरत होता. यात काही नवीन नाही. असे बेघर लोक जिकडे तिकडे दिसतात. त्याचे कपडे अत्यंत खराब अन्‌ फाटके-मळके तर होतेच. आणि त्याने असले नसले सगळे कपडे चढवून ठेवले होते. टोपी फाटलेली अन् घाणेरडी होती. गळ्यात ३ हेडफोन. [इथले भिकारी असेच "यो" असतात] हा माणूस बेघर असायला काहीच हरकत नव्हती. कारण ज्या माणसाकडे घर नसतं तोच त्याच्याकडचे सगळे कपडे घालून फिरत असतो. इतर भिकार्‍यांप्रमाणे ह्याचीही दाढी वाढलेली होती. स्वत:शी कधीकधी हसणं चालू होतं, पण ते हेडफोनच्या तालावर. डोळ्यावर चश्मा होता. मला नक्की आठवत नाही, पण चश्म्याची एक काडी बहुतेक सेलोटेप ने जोडलेली होती. त्याने अगदी चुरगाळलेली एक डॉलरची नोट हातात धरली होती. बहुतेक त्याच्या येवढ्या कपड्यांच्या एखाद्या खिशाच्या कोपर्‍यातून महत्प्रयासाने शोधून काढली असावी. आणि कदाचित तो इथे नेहमी खायला येत असावा, कारण, काही वेळाने टपरी वाल्याने, "हां जेम्स, काय सेवा करू तुझी?" असं विचारलं देखील त्याला. टपरीवाल्याशी बोलायला जाताना, "जेम्स" आमच्या पाशी आला, हातातल्या गठ्ठ्यातून २ कागद काढले, अन्‌ आमच्या पुढे धरत म्हटला, "पॅरीस मधल्या रस्त्यांवरून फिरताना, आलँ रोब-ग्रिये च्या दाँ ल लाबिरँथ, ह्या कांदबरीवरून मला ही कविता स्फुरली होती. प्रत्येक कवितेत मानवी अस्तित्वाची एक वेगळी-वेगळी झलक असते." - त्याच्या आवाजात कसलीतरी घाई होती आणि माझ्या चेहर्‍याने स्वसंमतीने "आ" वासलेला होता. कवितेच्या पानावर जेम्स नेमेथ ह्या माणसाच्या वेबसाईट ची लिंक छापलेली होती. मी बराच शोध घेतला, पण १० वर्षांपूर्वी आगीत जळालेल्या एका कॉफीच्या दुकानाच्या चाहत्यांच्या फेसबूक ग्रूप वर टाकलेल्या त्याच तुटलेल्या लिंक शिवाय दुसरं काहीच सापडलं नाही.

जेम्स ला लागलेल्या वेडाला काय म्हणावं मला कळत नाहीये. जगण्याचं वेड असावं बहुतेक.

-----

"येडे लोकच माझ्यासाठी खरे लोक आहेत. असे, ज्यांना जगण्याचं येड लागलंय, ज्यांना बोलण्याचं येड लागलंय, अन्‌ असेही, ज्यांना मुक्त व्हायचंय; ज्यांना एकाचवेळी सगळ्याच गोष्टी हव्या असतात, जे कधीच आळस अन्‌ जांभया देत नाहीत, ना कधी किरकोळ वा साधारण गोष्टी बोलतात --- पण, एकामागून एक फुटत आकाशभर पसरत जाण्यार्‍या दिमाखदार आतषबाजी प्रमाणे जे फाड्‍ फाड्‍ फाड्‍ जळत जातात... आणि मग मधला सुंदरसा निळा गोलक प्रकाशमान होऊन विझून गेला तरीही लोकांच्या चेहर्‍यावरचं आश्चर्य विरत नाही." --- Jack Kerouac.
टप्पा (२)

एक आठवड्यापासून बाहेर ढगांचं बेक्कार धुमशान चाललंय. पोट फोडून ओरडतायत, जोशात आकाश कापत अख्या खंडावर पसरतायत. शांत चित्ताने, दुलईत गुरफटून त्यांची मजा बघताना खूप आनंद होतोय. अरे होती एक संध्याकाळ अशीही --- येड्या लोकांबरोबर, तिसर्‍याच देशात, कोपर्‍यातल्या एका शहरात, ठिकठिकाणच्या युवक-युवतींच्या आवाजात आवाज मिसळून झकास गाणी गात होतो. अरे होता एक काळ असाही, जेव्हा दर आठवडा नवीन शहरात जन्म घेत होता; नवीन, बहुरंगी, बहुढंगी  पराग-कणांशी भेट घडवत होता. काय योगायोग, अगदी त्याच वेळेस Kerouac चं "On the road" हाती होतं. अक्षरश: पाककलेच्या पुस्तकात बघून जेवण बनवावं तसं त्या पुस्तकात बघून आयुष्य जगणं चालू होतं. एक-एक स्वप्न असं पूर्ण होत गेलं की काय मस्त वाटतं! जीवनातल्या काही अविस्मरणीय प्रसंगांची ती एक फक्त सुरुवात होती. तेजस्वी स्मरणिकांच्या तरूणरेखा जन्म घेत होत्या....

गेल्या महिन्यात त्या गाण्याच्या कंपूला "आच्छा" म्हटलं. आता नवी सुरुवात!

"कसं वाटतं हो तेव्हा, जेव्हा तुम्ही लोकांपासून दूर जात असता आणि वेगाने छोट्या होत जाणार्‍या त्यांच्या आकृत्या क्षितिजावर जाता जाता इतस्तत: विखरून अदृश्य होतात? तो कदाचित त्या लोकांचा घेतलेला निरोप असतो, हे अवाढव्य भूमंडळ आपल्यावर झेप घेत असतं आणि ह्या चिरंजीवी तारकांच्या साक्षीने आपण पुढच्या येड्या साहसासाठी सज्ज होतो. " --- Jack Kerouac

------

"टप्पा" हा संगीत प्रकार ऐकला आहेत कधी?

------

खिडकीतून डोकं बाहेर काढल्यावर तुफान वार्‍याबरोबर दाही दिशांना उडणार्‍या केसांप्रमाणे "ब्राउन ची चाल" जगला आहात कधी?
खेलेद-झारम

IIT च्या प्रवेश परीक्षेचा निकाल तोंडावर होता. जर निवड झाली नसती तर इतर अनेक बावळट प्रवेश परीक्षांचा ताप मागे लागला असता आणि नसती कटकट वाढली असती. आणि मला एव्हाना परीक्षांचा बेक्कार कंटाळा आला होता, सहाजिकच त्यामुळे धाकधूकही वाढली होती. रात्री मला बरंच टेंशन आलं होतं. जेवताना मी बहुतेक तेच-तेच परत-परत बोलत होतो - की अजून एकदा त्या परीक्षेला बसायचं नाहीये, पुण्यात कुठे ऍडमिशन घ्यायची नाहीये, एक ना दोन. बाबा इतका वेळ शांतच होते. जेवण झाल्यावर त्यांनी शांतपणे त्यांची रुद्राक्षाची माळ मला काढून दिली, अन्‌ तोंडाने फक्त "असूदे" म्हणाले.  दुस-या दिवशी ईष्ट तो निकाल लागला. पुढे कानपुरला गेल्यावरही कितीतरी दिवस मी ती माळ घालत असे. त्या माळेत एकच रुद्राक्ष होतं आणि त्याला चंदनाचा सुंदर वास येत असे. पुढे ब-याच "टेंशन-धारी" परीक्षांचा दाह त्या रुद्राक्षाने कमी केला. गाडी मार्गी लागली, अभ्यास उत्तम सुरू झाला. दुस-या सेमीस्टर मध्ये एक दिवस अचानक आमच्या हॉस्टेल वाल्यांना काय हुक्की आली देव जाणे, पण सगळे कबड्डी खेळायला लागले. मीही घुसलो. अन्‌ खेळता खेळता एकाचा हात अडकून ती माळ भंगली. "आता तुला माझी गरज नाही, मित्रा. अलविदा!" त्या रुद्राक्षाच्या भावना माझ्या मनापर्यंत सुखरूप पोचल्या. ते रुद्राक्ष अजूनही माझ्याकडे आहे, आणि अजूनही त्याला चंदनाचा मंद वास येतो.

१ मे २००८ च्या पहाटे ब-याच बदलांना "उद्योग-नगरी" [एक्स्प्रेस] च्या झनाट वेगाने सुरूवात झाली. नवं शहर नवं राज्य. पुढील दोन महीन्यांची "पराग चाल" [उर्फ Brownian Motion: ह्या शिंच्या Brownian Motion ला फायनान्स मध्ये आणि ख-या जिवनातही पर्याय नाही.] बंगळूरूत घडणार होती. सुमारे एका महीन्यातच एके संध्याकाळी घरी येताना सुळसुळीत पँटच्या झुळझुळीत खिश्यातून माझा मोबाईल कुठेतरी पडला. करता येण्याजोगे काही सोपस्कार करून झाले. चिंता होतीच. थोड्यावेळाने उस्त्याबरोबर जेवायला बाहेर पडलो. आणि जेवण झाल्यावर उस्त्या ईमेल चेक करायला सायबर कॅफे मध्ये घुसला. मी त्याचं होईस्तोवर बाहेरच थांबलो. बाहेर सुरेख हवा पडली होती. थंड वारा वहात होता. मी नकळतच अक्षरश: रस्त्यावर पाय टाकून फूटपाथ वर बसलो. अचानक मला मोबाईल हरवण्याचा खरा अर्थ लक्ष्यात आला. त्या एका मोबाईल बरोबर किती गोष्टींची झकास विल्हेवाट लागली होती! उदा: बिनडोकासारखे प्राणपणाने जपलेले "काही" SMS; ज्यांना मी आयुष्यात परत कधीही फोन करणार नाही अश्या लोकांचे नंबर्स...भरीत भर म्हणजे पुढचे काही क्षण माझ्यासाठी स्वातंत्र्याची मस्त व्याख्या झाले होते. मी वाटेल ते करायला मोकळा होतो. अर्थातच मी बेजबाबदार असं काहीच केलं नाही, पण ती पूर्ण स्वातंत्र्याची भावना एकमेवाद्वितीय होती. कुठेतरी माझा मोबाईल मला म्हणत होता:  "आता तुला माझी गरज नाही, मित्रा. अलविदा!"

Lord Of The Rings मधलं एक वाक्य मला फिरून आठवतंय - Memory is not what the heart desires. That is only a mirror, be it clear as Kheled-zaram. असंख्य स्मरणिका असलेली माझी हार्ड-डिस्क आता अखेरच्या घटका मोजतेय. बरोबर पाच वर्षापूर्वी नवीन घेतलेल्या जीन्सची आज लक्तरं व्हायला झालीयेत. ज्या दिवशी मी तिची घडी मोडली तो दिवस मला अजूनही जसाच्या तसा लक्षात आहे. "आता तुला ह्या स्मरणिकांची गरज नाही रे" मला असंख्य निरोप ऐकू येतायत. अशीच कधीतरी गरज संपेल तेव्हा माझं पैशांचं पाकीटही हरवेल, आणि त्याच बरोबर फक्त पैशांचीच नाही तर कितीतरी निरूपयोगी स्मरणांची झकास विल्हेवाट लागलेली असेल.
शुभ्र नौका
[मूळ कविता: "Golden Boat", रबिंद्रनाथ टागोर]

पोटी पाऊस, स्वर खिन्न खर्ज, नभी होते पयोधर,
नदीकाठी मी होतो जेव्हा मंद, उदास, एकटा, अधीर.
सुगीही संपत आलेली, नीट जमत आलेले भारे,
नदी मात्र चिडलेली, तिचे अंग बिनसलेले सारे.
पीक कापता कापता, प्रविष्ट झाली पावसाची सर.

एक उभं भाताचं शेत अन्‌ दुसरा उभा मी एकटा -
चारी बाजूस पसरलेल्या पूर-जलाचा भाव चेटका.
पैलतीरावर झाडे, अस्पष्ट अंधुक सावल्या जश्या,
घरांच्या सावळ्या चित्रावर परसरत्या शाईच्या दिशा तश्या.
ऐलतीरावर मात्र एक शेत, अन्‌ दुसरा उभा मी एकटा.

तटासमीप नाव हाकत येणारी ही कोणाची आकृती?
गाणे गात येणा-या तिच्याशी माझी ओळख कोणती?
विक्राळ नदीशी भांडत तिची नाव येते आहे,
तिची नजर ठाम आहे, शिडेही भरली आहेत.
माझी तिची ओळख काय, कशा चाळवल्या स्मृती!

कुठल्या दूर देशी निघालीस, हे अनामिके,
एकवार तटाशी ये, नांगरून ठेव नाव जराशी,
मग जा हवं तिथे, मन मानेल ते कर,
पण तटावर ये, दाखव तुझी खळी जराशी,
अन्‌ परतताना ने माझे शुभ्र पीक तितके.

अगं घे, मनमुराद घे, भरभरून घे,
शेवटचा शुभ्र दाणासुद्धा लादून घेवून जा,
माझ्या इथल्या अविश्रांत श्रमाचा,
मी हळूहळू निरोप घेतोय कायमचा,
म्हणूनच दया कर, अन्‌ मलाही तुझ्यासवे ने.

छे! छे! त्या नावेत कोठली येवढी जागा?
माझ्या शुभ्र पिकाने ती पूर्ण भरली बघा!
स्वर खिन्न खर्ज, ल्याले दु:ख तन, घन घोर
मी एकटा अधीर, नागव्या नदीतटावर,
होते तेही घेऊन गेली, गेली शुभ्र नौका दूर!

-----

[मंदार आणि प्रसाद चे आभार]
येडा

आजच, ह्या क्षणी, मला त्या येड्याची आठवण का व्हावी ह्याला बरीच कारणं आहेत. माझी अन्‌ त्याची काहीच ओळख नाही. पण मला तो आमच्या चहाच्या टपरीवर खूप वेळा दिसायचा. तो कुठून यायचा, त्याला घर-दार होतं की नाही देव जाणे. देवच जाणे. देव तर त्याचा एकदम जानी दोस्त होता.  येड्याचे कपडे अगदी भिका-यांसारखे असायचे. चौकोनी चेहरा, आणि अत्यंत अव्यवस्थित खुरटलेली दाढी. आमच्या चहावाल्याकडून त्याला दिवसातून कैक वेळा चहा मिळायचा. आणि येड्याकडे विड्यांची कधीच ददात नसायची. पान-मसाला खाऊन येड्याचे दात अगदी लाल-तपकिरी झालेले. तो सतत स्वत:शी कायतरी बडबडत असायचा. येड्याचा एक पाय त्याच्या जानी दोस्ताने ठेवून घेतला होता. म्हणून येडा नेहमी कुबड्या घेऊन किंवा त्याच्या चाकाच्या खुर्चीवरून यायचा.

आमची चहाची टपरी "संकट मोचन" मारुती च्या छोट्याश्या देवळालगतच आहे. येडा त्याच्या जानी दोस्ताबरोबर लई विड्या ओढी आणि मला आज त्याची तीच मुद्रा आठवतेय. तो लंगडत लंगडत येई आणि मारुतीसमोर येऊन बसे. मग सावकाश त्याच्या विड्यांचं पाकिट काढे. त्यातली एक एक विडी बाजूला काढून प्रत्येक विडी सोडवून त्यातली तंबाखू काढून घेई. अगदी निवांतपणे. मग ती तंबाखू सावकाश चोळून घेई आणि परत एकेका विडीत भरे. त्या नंतर जगातल्या शहाण्यातल्या शहाण्या माणसाला अचंबित करेल अशी एक गोष्ट करे: देवाला आई-माई वरून यथेच्छ शिव्या देई. अगदी अनिर्बंध. शिध्धी बात. आमने सामने. 

आजच, ह्या क्षणी, मला त्या येड्याची आठवण का व्हावी ह्याला बरीच कारणं आहेत.