खेलेद-झारम

खेलेद-झारम

IIT च्या प्रवेश परीक्षेचा निकाल तोंडावर होता. जर निवड झाली नसती तर इतर अनेक बावळट प्रवेश परीक्षांचा ताप मागे लागला असता आणि नसती कटकट वाढली असती. आणि मला एव्हाना परीक्षांचा बेक्कार कंटाळा आला होता, सहाजिकच त्यामुळे धाकधूकही वाढली होती. रात्री मला बरंच टेंशन आलं होतं. जेवताना मी बहुतेक तेच-तेच परत-परत बोलत होतो - की अजून एकदा त्या परीक्षेला बसायचं नाहीये, पुण्यात कुठे ऍडमिशन घ्यायची नाहीये, एक ना दोन. बाबा इतका वेळ शांतच होते. जेवण झाल्यावर त्यांनी शांतपणे त्यांची रुद्राक्षाची माळ मला काढून दिली, अन्‌ तोंडाने फक्त "असूदे" म्हणाले.  दुस-या दिवशी ईष्ट तो निकाल लागला. पुढे कानपुरला गेल्यावरही कितीतरी दिवस मी ती माळ घालत असे. त्या माळेत एकच रुद्राक्ष होतं आणि त्याला चंदनाचा सुंदर वास येत असे. पुढे ब-याच "टेंशन-धारी" परीक्षांचा दाह त्या रुद्राक्षाने कमी केला. गाडी मार्गी लागली, अभ्यास उत्तम सुरू झाला. दुस-या सेमीस्टर मध्ये एक दिवस अचानक आमच्या हॉस्टेल वाल्यांना काय हुक्की आली देव जाणे, पण सगळे कबड्डी खेळायला लागले. मीही घुसलो. अन्‌ खेळता खेळता एकाचा हात अडकून ती माळ भंगली. "आता तुला माझी गरज नाही, मित्रा. अलविदा!" त्या रुद्राक्षाच्या भावना माझ्या मनापर्यंत सुखरूप पोचल्या. ते रुद्राक्ष अजूनही माझ्याकडे आहे, आणि अजूनही त्याला चंदनाचा मंद वास येतो.

१ मे २००८ च्या पहाटे ब-याच बदलांना "उद्योग-नगरी" [एक्स्प्रेस] च्या झनाट वेगाने सुरूवात झाली. नवं शहर नवं राज्य. पुढील दोन महीन्यांची "पराग चाल" [उर्फ Brownian Motion: ह्या शिंच्या Brownian Motion ला फायनान्स मध्ये आणि ख-या जिवनातही पर्याय नाही.] बंगळूरूत घडणार होती. सुमारे एका महीन्यातच एके संध्याकाळी घरी येताना सुळसुळीत पँटच्या झुळझुळीत खिश्यातून माझा मोबाईल कुठेतरी पडला. करता येण्याजोगे काही सोपस्कार करून झाले. चिंता होतीच. थोड्यावेळाने उस्त्याबरोबर जेवायला बाहेर पडलो. आणि जेवण झाल्यावर उस्त्या ईमेल चेक करायला सायबर कॅफे मध्ये घुसला. मी त्याचं होईस्तोवर बाहेरच थांबलो. बाहेर सुरेख हवा पडली होती. थंड वारा वहात होता. मी नकळतच अक्षरश: रस्त्यावर पाय टाकून फूटपाथ वर बसलो. अचानक मला मोबाईल हरवण्याचा खरा अर्थ लक्ष्यात आला. त्या एका मोबाईल बरोबर किती गोष्टींची झकास विल्हेवाट लागली होती! उदा: बिनडोकासारखे प्राणपणाने जपलेले "काही" SMS; ज्यांना मी आयुष्यात परत कधीही फोन करणार नाही अश्या लोकांचे नंबर्स...भरीत भर म्हणजे पुढचे काही क्षण माझ्यासाठी स्वातंत्र्याची मस्त व्याख्या झाले होते. मी वाटेल ते करायला मोकळा होतो. अर्थातच मी बेजबाबदार असं काहीच केलं नाही, पण ती पूर्ण स्वातंत्र्याची भावना एकमेवाद्वितीय होती. कुठेतरी माझा मोबाईल मला म्हणत होता:  "आता तुला माझी गरज नाही, मित्रा. अलविदा!"

Lord Of The Rings मधलं एक वाक्य मला फिरून आठवतंय - Memory is not what the heart desires. That is only a mirror, be it clear as Kheled-zaram. असंख्य स्मरणिका असलेली माझी हार्ड-डिस्क आता अखेरच्या घटका मोजतेय. बरोबर पाच वर्षापूर्वी नवीन घेतलेल्या जीन्सची आज लक्तरं व्हायला झालीयेत. ज्या दिवशी मी तिची घडी मोडली तो दिवस मला अजूनही जसाच्या तसा लक्षात आहे. "आता तुला ह्या स्मरणिकांची गरज नाही रे" मला असंख्य निरोप ऐकू येतायत. अशीच कधीतरी गरज संपेल तेव्हा माझं पैशांचं पाकीटही हरवेल, आणि त्याच बरोबर फक्त पैशांचीच नाही तर कितीतरी निरूपयोगी स्मरणांची झकास विल्हेवाट लागलेली असेल.

12 comments:

Medha said...

खरच अश्या आवडत्या किव्हा काही उगीचच जपलेल्या वस्तुंच हरवणे/हातुन निसटणे त्या त्या गोष्टींची गरज संपली म्हणुन स्विकारता आले तर आयुष्या कित्ती सोपे होवुन जाईल..मला आवडला मनापासुन हा positive विचार... मी last week ब्लोग follow करायला लागले आहे.. आणि पहिल्यांदाच प्रतिक्रिया देते आहे..
सगळं नाही वाचले .. अजुन .. वाचेन सावकाशीने.. छान लिहितोस तु.. :)

Shashank Kanade said...

धन्यवाद मेधा! मनापासून आभारी आहे :)

Nachiket said...

phaar sundar (amcha evdha adhikaar naahi tari :D) ... aani(sahajikach) kheled-zaram cha ullekh khup aawadlaa .. :)

Rahul Deshmukh said...

तुझं पाकिट हरवण्याचं वाक्य वाचल्यावर लगेच आठवण झाली ती ’Into The Wild' ची. सिनेमामध्ये एका प्रसंगात Christopher McCandeless त्याच्या पाकिटातली सगळी आयडेंटिटी कार्डं, सगळे पैसे काढून जाळतो, पाकीट फ़ेकून देतो आणि कपड्यांची सॅक पाठीला लावून मुक्तपणे नव्या आयुष्याची सुरवात करतो.

आपल्यालाही कधीतरी पाकिट पडण्याची वाट न बघता स्वत:च असं मुक्त होता आलं तर छान होईल ना?

बाकी, नेहमीप्रमाणे पहिल्या उतार्‍यात लेखाचा विषय शक्यतो कळून न देता शेवटी सगळ्या गोष्टींची संगत घालणं जमलंच आहे. मस्त लेख!!!

Shashank Kanade said...

नच्या, अधिकार वगैरे काय बोलायला लागलास रे एकदम?
राहुल, तो पिच्चर बघितला नाहीये अजून. बघायलाच पाहिजे आता :)

थँक्यू हां!

Sushant said...

क्या बात है!
खूप सुंदर विचार आहेत..फार आवडले.
जाताना आपल्यालाच म्हणता आलं पाहिजे, "आता तुम्हाला माझी काही गरज नाही..अलविदा!"

Saee said...

bharee..thode diwsanni saglyakade ek "observer" mhanun baghta ala pahije. Athvani sundar astat. Pan tya alyamule du:kha nahi zala mhanje milavla. :)
Well written and very sincere. :)
Cheers
Saee

yog said...

to say bye, really helpful..

Vikram said...

Hi, malecha kissa far avadla! Nirjeev vastu tila chkatlelya bhavnaan mule kiti jivant hote he te tu chan dhkhvun dilas!

Its all in our mind, we see what we want to see!

Aditya said...

khoop chaan waTala wachun ..
mobile chya kissyawarun suchla -
mi recently mobile waparna almost-banda (khooop-kami) kelay .. aaNi tyatla sukh aapoap anubhawla .. manapasun waTata ki pre-mobile jag kiti changla hota - jyanchya shi contact thewaycha asto ti(ch) loka aapoap touch madhe rahtat ..

Sumit said...

Harawlelya goshtinchi garaj sampleli astenahitar (kadhi kadhi)aaplyala tya goshticha mahatwa pataava yasathi khelaleli aandhali-koshimbir aste! Tya vastuchi aaplyala asleli garajjitki mahatwachi titikich tya vastuchi aplyasobat jagnyachi ichhadekhil ya khelamadhye nirnyakak tharte, nahi ka?
Tuzyamule mala ashya ruchkar goshti vachaila miltahet yabaddal tuze abhaarr!

Mandar Gadre said...

खूप सुरेख, शशांक! आवडलं :)