येडा

आजच, ह्या क्षणी, मला त्या येड्याची आठवण का व्हावी ह्याला बरीच कारणं आहेत. माझी अन्‌ त्याची काहीच ओळख नाही. पण मला तो आमच्या चहाच्या टपरीवर खूप वेळा दिसायचा. तो कुठून यायचा, त्याला घर-दार होतं की नाही देव जाणे. देवच जाणे. देव तर त्याचा एकदम जानी दोस्त होता.  येड्याचे कपडे अगदी भिका-यांसारखे असायचे. चौकोनी चेहरा, आणि अत्यंत अव्यवस्थित खुरटलेली दाढी. आमच्या चहावाल्याकडून त्याला दिवसातून कैक वेळा चहा मिळायचा. आणि येड्याकडे विड्यांची कधीच ददात नसायची. पान-मसाला खाऊन येड्याचे दात अगदी लाल-तपकिरी झालेले. तो सतत स्वत:शी कायतरी बडबडत असायचा. येड्याचा एक पाय त्याच्या जानी दोस्ताने ठेवून घेतला होता. म्हणून येडा नेहमी कुबड्या घेऊन किंवा त्याच्या चाकाच्या खुर्चीवरून यायचा.

आमची चहाची टपरी "संकट मोचन" मारुती च्या छोट्याश्या देवळालगतच आहे. येडा त्याच्या जानी दोस्ताबरोबर लई विड्या ओढी आणि मला आज त्याची तीच मुद्रा आठवतेय. तो लंगडत लंगडत येई आणि मारुतीसमोर येऊन बसे. मग सावकाश त्याच्या विड्यांचं पाकिट काढे. त्यातली एक एक विडी बाजूला काढून प्रत्येक विडी सोडवून त्यातली तंबाखू काढून घेई. अगदी निवांतपणे. मग ती तंबाखू सावकाश चोळून घेई आणि परत एकेका विडीत भरे. त्या नंतर जगातल्या शहाण्यातल्या शहाण्या माणसाला अचंबित करेल अशी एक गोष्ट करे: देवाला आई-माई वरून यथेच्छ शिव्या देई. अगदी अनिर्बंध. शिध्धी बात. आमने सामने. 

आजच, ह्या क्षणी, मला त्या येड्याची आठवण का व्हावी ह्याला बरीच कारणं आहेत.