On the road (१)

सकाळी ६ वाजता, यांत्रिकपणे कॉफी पिणार्‍यांच्या घोळक्यात, नटी एकटीच हातवारे करत फिरत होती. नटी किंचीत येडी होती यात शंकाच नाही. येणार्‍या जाणार्‍यांना तावातावाने प्रश्न विचारत होती. कधी कधी उसनं अवसान आणून खोटं खोटं हसत होती. कॉफी च्या दुकानात सर्वांसमोर कसलं तरी गार्‍हाणं मांडत होती. कधी पुटपुटत तर कधी आवेशात, कधी खोटं खोटंच हसत होती, कधी खरंच रडत होती. सकाळी ६ वाजता, यांत्रिकपणे कॉफी पिणार्‍यांपैकी एकालाही नटीशी काहीही घेणं देणं नव्हतं. तरीही ती त्या अवाढव्य मंचावर मुक्तपणे फिरत होती. एकदा नजरा-नजर झाली तेव्हा, "नामास्ते, इंडियन!" म्हणाली. किंचीत येडी होती यात शंका नाही,  पण किती ते सांगणं अवघड आहे.

-----

बोचरा वारा आणि वर वांझोटा सूर्यप्रकाश. २० मैल सायकल वरून रपेटल्यावर निवांत तळ्याकाठी फोटो काढत विसावलो होतो. "काय! झालं का वार्‍याला फोटोत पकडून?", येवढ्या कडक वार्‍यातही शर्ट सत्ताड उघडा ठेवलेला एक बाबा उभा होता. त्याचं नाव उलाव्ह. बोलायला सुरुवात झाली. बर्‍याच वेळी असले बाबे शेवटी "दादा, घरी जायला पैसे नाहीत, एखाद डॉलर देता का" वगैरे विचारते होतात, पण ह्या माणसाचे डोळे मिश्कील होते. त्यामुळे तो एखादा धर्मोपदेशेक असण्याचीही शक्यताही कमीच होती. [असलेही बाबे खूप दिसतात. बाबे हे "बाबा" चे अनेकवचन आहे.] एकातून एक विषय निघत गेले. गप्पा रंगल्या. विश्चाच्या "बाहेर" काय असतं? नसणं म्हणजे काय? आईनष्टाईन चा सापेक्षतावाद वगैरे पर्यंत गाडी गेली. [ज्याबद्दल मला अगदीच नगण्य माहिती होती. असो.] ह्या बाबाला बोलण्याचं येड होतं. उलाव्ह नॉर्वेत वाढला. "आमच्या इथे सदा सर्वदा असाच वारा", उलाव्ह म्हणाला. त्यांचं घर अगदी समुद्राकाठी होतं. आणि वारा येवढा, की वार्‍याने उडवून नेलेल्या कोंबड्यांच्या संख्येवरून त्याची ताकद मोजायची. बरेचसे केस पांढरे झालेल्या उलाव्ह च्या उघड्या छातीचं रहस्य आता उकललं. उलाव्ह ला तो थोडासा सूर्यप्रकाशही पुरेसा होता. "अश्यावेळी की नाही, खूप उंच गवतात जाऊन झोपायचं. खूप मऊ पण वाटतं, वार्‍याचा त्रास देखील होत नाही, आणि वरून छान प्रकाशही मिळतो". उलाव्ह एक क्षण थांबला. "मित्रा, असे आनंद स्वत:च शोधायचे. अश्या छोट्या छोट्या गमती दुसरं कोणीही तुला सांगायला येणार नाही!" उलाव्ह चा स्वरात किती आर्जव भरलं होतं!

"पोरा, वय काय तुझं? तुला अजून जीवनात खूप अनुभव घ्यायचे आहेत. चांगले, वाईट, सगळेच. आणि आज इथे जर जुना उलाव्ह असता तर तो असं मुळीच कोणाशीही जाऊन बोलला नसता. हे वेड वयाबरोबर येतं बघ."
सायकलच्या चक्क हॅंडलवरच उलटं बसून पॅडल मारत मारत उलाव्ह ने आमचा निरोप घेतला. पांढर्‍या केसांच्या, मिश्किल डोळ्यांच्या, जराश्या बुटक्या, येवढ्या वार्‍यातही छाती सत्ताड उघडी ठेवणार्‍या आणि पेशाने स्थापत्य-शास्त्रज्ञ असलेल्या उलाव्ह ने बोलण्याचं वेड काय सुरेख आत्मसात केलं होतं!

-----

विविध लोकांची ओळख करवण्यासाठीच दिवसाचा उत्तरार्ध जन्मला आहे.

नुकतीच संध्याकाळ येऊ घातली होती. मी आणि माझा मित्र एका टपरीवर ऑर्डर ची वाट बघत उभे होतो. समोर एक भिकारी इकडेतिकडे फिरत होता. यात काही नवीन नाही. असे बेघर लोक जिकडे तिकडे दिसतात. त्याचे कपडे अत्यंत खराब अन्‌ फाटके-मळके तर होतेच. आणि त्याने असले नसले सगळे कपडे चढवून ठेवले होते. टोपी फाटलेली अन् घाणेरडी होती. गळ्यात ३ हेडफोन. [इथले भिकारी असेच "यो" असतात] हा माणूस बेघर असायला काहीच हरकत नव्हती. कारण ज्या माणसाकडे घर नसतं तोच त्याच्याकडचे सगळे कपडे घालून फिरत असतो. इतर भिकार्‍यांप्रमाणे ह्याचीही दाढी वाढलेली होती. स्वत:शी कधीकधी हसणं चालू होतं, पण ते हेडफोनच्या तालावर. डोळ्यावर चश्मा होता. मला नक्की आठवत नाही, पण चश्म्याची एक काडी बहुतेक सेलोटेप ने जोडलेली होती. त्याने अगदी चुरगाळलेली एक डॉलरची नोट हातात धरली होती. बहुतेक त्याच्या येवढ्या कपड्यांच्या एखाद्या खिशाच्या कोपर्‍यातून महत्प्रयासाने शोधून काढली असावी. आणि कदाचित तो इथे नेहमी खायला येत असावा, कारण, काही वेळाने टपरी वाल्याने, "हां जेम्स, काय सेवा करू तुझी?" असं विचारलं देखील त्याला. टपरीवाल्याशी बोलायला जाताना, "जेम्स" आमच्या पाशी आला, हातातल्या गठ्ठ्यातून २ कागद काढले, अन्‌ आमच्या पुढे धरत म्हटला, "पॅरीस मधल्या रस्त्यांवरून फिरताना, आलँ रोब-ग्रिये च्या दाँ ल लाबिरँथ, ह्या कांदबरीवरून मला ही कविता स्फुरली होती. प्रत्येक कवितेत मानवी अस्तित्वाची एक वेगळी-वेगळी झलक असते." - त्याच्या आवाजात कसलीतरी घाई होती आणि माझ्या चेहर्‍याने स्वसंमतीने "आ" वासलेला होता. कवितेच्या पानावर जेम्स नेमेथ ह्या माणसाच्या वेबसाईट ची लिंक छापलेली होती. मी बराच शोध घेतला, पण १० वर्षांपूर्वी आगीत जळालेल्या एका कॉफीच्या दुकानाच्या चाहत्यांच्या फेसबूक ग्रूप वर टाकलेल्या त्याच तुटलेल्या लिंक शिवाय दुसरं काहीच सापडलं नाही.

जेम्स ला लागलेल्या वेडाला काय म्हणावं मला कळत नाहीये. जगण्याचं वेड असावं बहुतेक.

-----

"येडे लोकच माझ्यासाठी खरे लोक आहेत. असे, ज्यांना जगण्याचं येड लागलंय, ज्यांना बोलण्याचं येड लागलंय, अन्‌ असेही, ज्यांना मुक्त व्हायचंय; ज्यांना एकाचवेळी सगळ्याच गोष्टी हव्या असतात, जे कधीच आळस अन्‌ जांभया देत नाहीत, ना कधी किरकोळ वा साधारण गोष्टी बोलतात --- पण, एकामागून एक फुटत आकाशभर पसरत जाण्यार्‍या दिमाखदार आतषबाजी प्रमाणे जे फाड्‍ फाड्‍ फाड्‍ जळत जातात... आणि मग मधला सुंदरसा निळा गोलक प्रकाशमान होऊन विझून गेला तरीही लोकांच्या चेहर्‍यावरचं आश्चर्य विरत नाही." --- Jack Kerouac.