हिमराज्य

हिमराज्य


अजून २४ तासात हळूहळू हा किनारा दूर जाणार होता. अजून २४ तासांत तिच्या भाषेतला एकन् एक शब्द हळूहळू माझ्या विस्मरणात जाणार होता. अजून २४ तासात जहाजाच्या फटीफटीतून बर्फाची शक्ती मनसोक्त फिरणार होती.

मला हल्ली एक स्वप्न सतत पडतं: सहजच चालता चालता मला उडी मारायची अनावर इच्छा होते, पण उडी कसली? माझे पाय जमिनीवर परत येत नाहीतच, मला अगदी अलगद सहजच उडता येतं... मला माझी मातृभाषा सोडून खूप दिवस झालेत. जितक्या सहजपणे गुरुत्वाकर्षणाच्या बंधनांना तोडून मला उडता येतं, तितक्याच सहजपणे मला फक्त तिच्याच भाषेतले शब्द डोळ्यापुढे येतात. पण हे फक्त अजून २४ तासंच. आणि मग? मग एक नविन प्रदेश, नवा सूर्य, नवा बर्फ, कदाचित एक नवी भाषा.

माझ्या मातृभाषेच्या काही नजीकच्या तर काही फार वर्षांपूर्वी दुरावलेल्या अश्या असंख्य बहिणी आहेत. थोड्याश्या सरावाने मला ह्या कुठल्याही भाषा अगदी सहजच समजायच्या. त्यांच्या शब्दात आणि माझ्या शब्दात नक्कीच एक समान धागा सापडायचा. पण दक्षिणेतली वावटळं उलटी, दक्षिणेतील पक्षी वेगळे, अन् दक्षिणेतली नक्षत्रही वेगळी. तशीच विशाल बर्फाच्छादित पर्वतांच्या पलीकडे जन्मलेली तिची भाषाही वेगळी. माझ्या विचारांनाही आताशा मातृभाषेच्या अतिपरिचित राज्यात चालता चालता अलगद उडी मारून तिच्या भाषेत विचार करायचं व्यसन लागलं होतं. ह्या नविन तारांगणात उडण्याचा उन्माद काही औरच होता.

सहजिकच, ह्या शेवटच्या २४ तासांवर केवळ तिच्याच भाषेचा हक्क होता. तिच्याच भाषेतील काही शतकांपूर्वीची एक कविता आहे: १००० अक्षरांची कविता. माझ्या सगळ्या भिंतींवर कुण्या एका तितक्याच जुन्या गुरुच्या हस्ताक्षरातील ह्याच कवितेचे दिमाखदार तक्ते. कृष्ण-धवलाचं साधलेलं अचूक वजन. शाईच्या प्रत्येक थेंबात, कुंचल्याच्या प्रत्येक रेषेतून उमटणारी त्याची ती आंतरिक उर्जा. सर्वात वर, आकाशात वेगाने उडणा-या फिनिक्स पक्ष्यासारखे उडणारे शब्द; त्यानंतर मध्यात बांबूच्या शीतल बनासारखी आखीव, पण शाश्वत सत्यासारखी अणकुचीदार अक्षरं, आणि सर्वात खाली जाड, भक्कम पृथ्वीसारखी चिरकाल अक्षरं. पण मेख अशी की तिची भाषा वाचायची अधारातून उर्ध्वाकडे: गोष्ट गुरुत्वाच्या अभेद्य त्वरणावर मात केलेल्या पक्ष्याची.

मी ते शेवटचे २४ तास कधीच विसरणार नाही. तिच्या भाषेत मी इतका उंच आता कधीच जाऊ शकणार नाही. अन् म्हणूनच ह्या नाविन्याने काठोकाठ भरलेल्या त्या अनुभवाचं असीम प्रांगण मी कधीच विसरणार नाही. आता ह्याच नाविन्याच्या भुकेचा अग्नी हृदयात पेटतो आहे. दक्षिणेतील, रात्री सुरेल रव करणा-या पक्ष्यांच्या छत्राखाली मी जितकं तिच्याशी बोललो तितकंच कोणाशीतरी वेगळ्याच भाषेत बोलण्याची इच्छा बळावते आहे.

आता तो किनारा दूर गेलाय. हळूहळू क्षितिजावर धृवाची चांदणी उगवते आहे. आता आमच्या जहाजाला बर्फात थिजलेल्या होकायंत्राच्या काट्याप्रमाणे निश्चित दिशा आहे. निरोप घेताना तिला आठवलेल्या, तिच्याच भाषेतील कुठल्या प्रसिध्द कादंबरीच्या सुरुवातीच्या ओळी, बर्फावरून परावर्तीत होणा-या चंद्रकिरणांप्रमाणे लख्ख तरळतायात: “देशाच्या सीमेवरील लांब बोगदा ओलांडून हिमराज्य आलं. रजनीची छाया धवल झाली अन् बर्फाची शक्ती सर्वत्र वाहू लागली.”

1 comment:

Swanand said...

Kamaal re, Shankya!!